डॉ. मोहन आगाशे – ज्येष्ठ अभिनेते
रुपेरी पडद्यावर वेगळ्या धाटणीच्या, विषयांच्या आणि सामाजिक आशय जपणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेतील पहिले पुष्प गुंफणारे श्याम बेनेगल हे नाव काळाच्या पडद्याआड गेले. अतिशय हुशार, कलात्मकदृष्ट्या संपन्न आणि कल्पक असणाऱ्या या दिग्दर्शकाने समांतर चित्रपटांचा एक ट्रेंड सेट केला. पुढे अनेकांनी त्यांचा आदर्श पुढे ठेवत मार्गक्रमणा केली. या अर्थाने आज अनेकांचा वाटाड्या हरपला आहे.
ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुखद आहे. १९७५-७६ मध्ये मी त्यांच्याबरोबर काम केले. या दोन वर्षांव्यतिरिक्त कधी तसा योग आला नाही. पण आजही ‘निशांत’ आणि ‘मंथन’चे ते दिवस आठवतात. पुढे त्यांच्या ‘भूमिका’चे चित्रीकरण पुण्यात सुरू होते आणि त्यात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली होती. मात्र त्याला काम म्हणता येणार नाही. हे सगळे बघता त्यांच्याबरोबर काम केलेल्याला सुमारे पन्नास वर्षांचा काळ उलटला आहे. त्यानंतरच्या काळात त्यांच्या चित्रपटात मी नसण्यामागे काही कारणे होती. त्यातील एक म्हणजे मी पुण्यात राहणारा आणि दुसरे म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये काम करायचो. त्यामुळे वेळेची गणिते जमवण्यात अडचण यायची. खेरीज आपल्या चित्रपटांमध्ये नवनवीन लोकांना संधी देणे त्यांना आवडायचे. त्यामुळेच एनसीडीमधून उत्तीर्ण झालेल्या अनेकांना त्यांनी ब्रेक दिला. त्यामध्ये नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, शबाना आझमी, नीना गुप्ता, स्मिता पाटील अशी नावे घेता येतील. या सगळ्यांबरोबर हेदेखील मान्य करायला हवे की, प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचे काही गट असतात. तसा त्यांचाही होता. जसा जब्बार पटेल आणि आम्हा मंडळींचा एक ग्रुप होता. तसेच हे काहीसे. अर्थात त्यांनी चित्रपट करणे बंद केल्यामुळे तोदेखील पुढे बंद झाला ही बाब वेगळी… अशाच प्रकारे सत्यदेव दुबेंचे थिएटर युनिट होते. त्यातून ते अमरीश पुरी, अमोल पालेकर आणि पुढे शशी कपूरसारख्या कलाकारांना चित्रपटांमधून घेत राहिले. याला आपण प्रवाह बदलत जातो, असेही म्हणू शकतो. अर्थातच प्रवाह बदलला की विचारही बदलत जातात.
शाम बेनेगल यांच्या चित्रपटांनी प्रवाह आणि विचार बदलण्याचे काम केले. या माणसाने अगदी जिद्दीने या क्षेत्रात पाय रोवले आणि खंबीरपणे होता त्या जागी उभा राहिला. त्यांना पहिली फिचर फिल्म करण्यासाठी तब्बल वीस वर्षे वाट पाहावी लागली. त्याआधी ते जाहिराती, डॉक्युमेंटरी, कॉर्पोरेट फिल्मस या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. मात्र योग्य संधी मिळताच त्यांनी फीचर फिल्म केली आणि ‘अंकुर’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने समांतर चित्रपटांच्या विश्वात एक ट्रेंड सेट केला. तोपर्यंत हे वारे बंगाल आणि मल्याळी चित्रसृष्टीपुरतेच सीमित होते. त्यामुळेच हिंदी चित्रसृष्टीत समांतर चित्रसृष्टी सुरू करण्याचे सगळे श्रेय श्याम बेनेगल यांना जाते. १९६०-७० च्या दशकात समांतर सिनेमा जन्माला आला, वाढलापण अल्पायुषी ठरला, कारण टेलिव्हिजनचे विश्व विस्तारण्याचा तोच काळ होता. त्यामुळे टीव्ही मोठा झाला तसे समांतर चित्रपट करणारे सगळे तिकडेे वळले. याचे कारण म्हणजे तेवढ्या बजेटमध्ये चित्रपट करणे, तो प्रदर्शित करणे शक्य होत नव्हते. हा प्रवाह थांबण्यामागील हे आर्थिक कारणही लक्षात घ्यायला हवे. म्हणूनच सत्यजित रे यांच्यापासून श्याम बेनेगलांपर्यंत सगळ्यांनी टेलिव्हिजन मालिका केल्या. अर्थात त्यातही त्यांनी वेगळेपण दाखवले. ‘यात्रा’, भारत की खोज’ यासारख्या मालिका आजही अनेकांच्या स्मरणात असतील.
असे असले आणि चांगले नाव झाल्यानंतरही श्याम बेनेगल यांचा पुढचा प्रवास सुकर झाला, असे म्हणता येणार नाही, कारण अशा दिग्दर्शकांनाही निर्माते मिळणे अवघड जातेच. श्याम बेनेगल यांनाही या समस्येचा सामना करावा लागला. म्हणून त्यांनी ‘मंथन’ केला. यातही त्यांनी सामाजिक विषयालाच हात घातला होता. असाच काळ सरला आणि पुढे पुढे तर ते केंद्र सरकारचे लाडके दिग्दर्शक झाले. ‘मेकग ऑफ महात्मा’, नेताजी सुभाषचंद्र’, ‘हरीभरी’, ‘भारत : एक खोज’ यासारखी उदाहरणे याची साक्ष देतील. थोडक्यात, प्रोड्युसर म्हणून केंद्र सरकारची साथ मिळवण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि त्यामुळेच आपल्याला हवे तसे चित्रपट त्यांना करता आले. आधी उल्लेख केल्याप्रमाणे याच कारणास्तव पुढे त्यांना प्रोड्युसर मिळण्यात खूप अडचणी आल्या.
वेगळ्या शैलीचे, सामाजिक विषयांना हात घालणारे, वेगळा प्रवाह निर्माण करणारे चित्रपट दिल्यामुळे जगात त्यांचे मोठे नाव झाले. ठिकठिकाणी ज्युरी म्हणून त्यांना आमंत्रणे येऊ लागली. त्यांचा वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आणि हे नाव चित्रसृष्टीमध्ये वेगळा दबदबा निर्माण करणारे ठरले. मुळात श्याम हुशार होते. त्यांचे वाचन अफाट होते. गिरीश कर्नाड आणि त्यांच्यामध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. आमच्या तिघांबद्दल बोलायचे तर ‘सारस्वत मैत्री’ होती, असे गमतीने म्हणता येईल. त्यांची आणि गिरीशची मैत्री बरीच घट्ट होती. मुळात अभिनेता नसणाऱ्या गिरीशला त्यांनी या साच्यामध्ये चपखल बसवले. व्यक्ती म्हणून ते मोठे होतेच. कुतूहल जपणारा, अभ्यासू असा हा माणूस होता. माझे त्यांच्याबरोबरचे संबंधही अगदी जिव्हाळ्याचे होते. कधीही भेटलो तरी आपुलकीने विचारपूस करणारा तो चांगला मित्र होता. पद्मश्री मिळाल्यानंतर माझे अभिनंदन करण्यासाठी ते खास मुंबईहून आले होते. थोडक्यात, बराच काळ एकत्र काम केले नसले तरी आमच्या संबंधांमध्ये वा मैत्रीमध्ये कधी दुरावा निर्माण झाला नाही. भेटल्यानंतर मनमोकळ्या गप्पा व्हायच्याच आणि त्याच वेळी, मी तुला एक काम देणे लागतो, असेही त्याचे वाक्य असायचे. तो योग आला नाही, ही बाब वेगळी. पण त्यामुळे नात्यामध्ये कधी फरक पडला नाही. खरे सांगायचे तर जब्बार, माणिकदा वा श्याम यांच्या युनिट्समध्ये एखाद्या कुटुंबासारखे वातावरण असायचे. सगळे त्याच आपुलकीने काम करायचे. पुढे काळ बदलला, टीव्ही आला आणि त्याचेही काॅर्पोरेटायझेशन झाले. त्यावर कमी बोलावे तेवढे बरे. पण तो काळ परत आला तर मला सिनेमा करायला परत मजा वाटेल हे मात्र नक्की. श्याम बेनेगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली!