Tuesday, January 14, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलसाहित्याशी जवळीक

साहित्याशी जवळीक

प्रतिभारंग – प्रा. प्रतभा सराफ

Good could not be everywhere, and therefore he made mothers.’ – Rudyard Kipling यांचे हे वाक्य मी कधी लहानपणापासून ऐकले नव्हते; परंतु जेव्हा एका ‘आई’ या विषयावरील स्पर्धेसाठी गेले तेव्हा त्या स्पर्धेत भाग घेतलेल्या पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांनी उच्चारले आणि मग माझ्या लक्षात आले की, सगळ्यांची आईविषयीची जी सर्वसाधारण सारखीच अशी भावना असते. तसेच सगळ्यांचे आई विषयीचे निबंध किंवा भाषण थोड्या फार प्रमाणात सारखेच असते. रुड्यार्ड किपलिंगचे हे वाक्य उच्चारताना सगळ्यांच्याच मनात आईविषयीचा कृतज्ञतेचा भाव होता, हे लक्षात आले.

आज हे आठवायचे कारण म्हणजे या ‘नवरंग साहित्य, संस्कृती आणि कलामंडळ’, नवी मुंबई या संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ‘एकांकिका महोत्सवा’चे आयोजन केले होते, त्याला जाण्याचा योग आला. तिथे अतिशय उत्साहाने त्या भागातील साहित्यिक आले होते. त्याच उत्साहात त्या भागातील रसिकही मोठ्या प्रमाणात रविवारच्या भल्या सकाळी
उपस्थित होते.

तिथे बसल्यावर मला अनेक गोष्टी आठवल्या की, अलीकडे कविता/कथावाचन, पुस्तक प्रकाशन, तर कधी परीक्षक म्हणून मी अनेक संस्थांमध्ये गेले आहे. म्हणजे मुंबईतच जवळजवळ पाचशे तरी साहित्यिक संघटना/संस्था असाव्यात असा माझा अंदाज आहे.

देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली, त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलन कार्यक्रमात आयुष्यभर साहित्य सेवा करूनही संधी मिळेलच, याची शाश्वती नसते. प्रत्येकाला काहीतरी सांगायचे असते, तो माणूस कधी कथेतून, कधी कवितेतून, कधी लेखातून व्यक्त होत राहतो. लिखाणातून व्यक्त होऊन नेहमीच भागत नसते, तर त्याला रसिकांसमोर त्याची साहित्यकृती सादर करायची असते, तिथे त्याला वाहवा मिळवायची असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष त्या क्षणी आपल्या साहित्यगुणांचे कौतुक होते, त्यातून त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळते, तर कमीत कमी अशा स्थानिक पातळीवरील संस्थांमध्ये निश्चितपणे त्याला ही संधी प्राप्त होते. ही गोष्ट साहित्यासाठी असली तरी तीच गोष्ट कलेसाठीसुद्धा लागू होते. छोट्या छोट्या संस्था आपल्या गाण्याची हौस, संगीताची हौस, नाचण्याची हौस, चित्रकलेची हौस अशा अनेक प्रकारच्या हौशी संघटनेतून ते पूर्ण करायचा प्रयत्न करतात.

मध्यंतरी एका संस्थेत मला बोलावले गेले. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आले की, आपल्या मुलांना शाळेत पोहोचवायला येणारे आई-वडील एकमेकांचे मित्र-मैत्रिणी झाले आणि त्यांनीच छोटेखानी साहित्य संस्था स्थापन केली. या साहित्य संस्थेमध्ये ही मंडळी त्यातल्याच कोणाच्या तरी एकाच्या घरी जमतात आणि त्या महिन्यात वाचलेले पुस्तक याविषयी थोडक्यात माहिती देतात. ती माहिती ऐकून इतर मित्र-मैत्रिणी त्यांना त्याविषयी अधिकचे प्रश्न विचारतात. चर्चा करतात. मग ते पुस्तक सगळ्यांकडे फिरतं. ज्या माणसाने विकत घेतलेले असते त्याच्यापर्यंत येते. पुढच्या महिन्यात नवीन पुस्तक आणि मग हाच उपक्रम चालू राहतो, तर या उपक्रमात कोणी तरी माझ्या पुस्तकातील कथा त्यादिवशी ऐकवणार होते आणि त्या पुस्तकावरील माझा पत्ता हा त्यांच्या इमारतीच्या खूप जवळचा वाटल्यामुळे त्यांनी मला संपर्क केला. मी आनंदाने होकारही दिला. त्यांचा हा उपक्रम एका इमारतीमधील चार घरांपुरता मर्यादित असला तरी मला महत्त्वाचा वाटला. खरे तर त्यांच्याकडे गेल्यावर माझ्या लक्षात आले की, त्यांना कोणत्याही व्यासपीठाची गरज वाटत नाहीये तर मराठी साहित्य नियमितपणे वाचले गेले पाहिजे, त्यावर चर्चा केली गेली पाहिजे, त्यानिमित्ताने महिन्यातून एक तरी पुस्तक प्रत्येकाने विकत घेतले पाहिजे असे काहीसे उद्देश या संस्थेचे होते.

हा विषय खूपच व्यापक आहे. न संपणारा आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण कितीही वृद्ध झालो, आपल्याला फारसा प्रवास करता येणे शक्य होत नसले तरीसुद्धा अशा उपक्रमांद्वारे आपण साहित्याच्या संपर्कात राहू शकतो. आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपल्या अर्थव्यवहारासाठी उपयोग झाला; परंतु साहित्यापासून आपण काही काळ दुरावल्या गेल्याची भावना कित्येकांना निवृत्तीनंतरही होते. तरी साहित्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याचे आयुष्यातील स्थान जाणून घेण्यासाठी वा त्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -