टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या पहाडी आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांचाच वारसा पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांचे सुपुत्र करीत आहे. त्याचे नाव आहे नंदेश उमप. आज स्वतःची ओळख निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला आहे. नंदेशचे शालेय शिक्षण विक्रोळीच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शालेत झाले. दर वर्षी शाळेत पावसाच्या कविता वाचन स्पर्धेमध्ये त्याला प्रथम क्रमांक मिळायचा. गायनाच्या स्पर्धेमध्ये त्याला बक्षीस मिळायचे. तो शाळेमध्ये नृत्य बसवायचा. प्रत्येक स्नेहसंमेलनात त्याचा सहभाग असायचा. नंदेश वडिलांसोबत कार्यक्रमाला जायचा, त्यामुळे त्याला शाळेत सकाळी यायला उशीर व्हायचा. त्यांना शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर उभे करण्यात येत असे, तरी देखील त्याला उशीर होत होता. यावर तोडगा म्हणून शाळेच्या फादरने नंदेशला सकाळी प्रार्थना झाल्यानंतर दररोज राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. परिणामी नंदेशला न चुकता दररोज सकाळी ७-१५ वाजता शाळेत हजेरी लावावी लागायची.
‘हुंडा घ्या हुंडा’ या चित्रपटासाठी त्याने सर्वप्रथम गाणे गायले; परंतु दुर्दैवाने तो चित्रपट रिलीज झाला नाही. त्यानंतर त्याने संगीतकार राम-लक्ष्मण यांच्याकडे नामा एम.डी. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. त्या चित्रपटामध्ये तीन गाणी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर सोबत गायली. त्या ‘रात्री पाऊस होता’ या चित्रपटात एक अंतरा आशाताईं यांनी गायला होता. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या मराठी चित्रपटात गाणे गाण्याची संधी नंदेशला मिळाली. त्यामध्ये त्याने गायलेला अफजलखानचा पोवाडा खूप गाजला. अजित परब यांनी या चित्रपटाचे संगीत दिले होते. हा चित्रपट त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर अनेक चित्रपटामध्ये त्याने गाणी गायली. ‘फकिरा’, ‘चिंटू-२’, या चित्रपटामध्ये गाणी गायली. त्यानंतर जांभूळ आख्यान हे नाटक त्याने केले. त्या नाटकाला संगीत नाटक एकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘देऊळबंद’, ‘संभाजीराजे’, ‘नाच गं घुमा’, ‘गारूड’, ‘पारंबाच्या सावल्या’, ‘धर्मवीर’ या चित्रपटासाठी गायन केले. गाण्याच्या रिॲलिटी शो बद्दल तुझे मत काय आहे असे विचारल्यावर नंदेश म्हणाला की, पालकांनी मुलांना गायनाच्या क्षेत्रात कुठपर्यंत न्यायचे हे ठरविले पाहिजे. गाणे हे सोपे नाही. गाणे हे शब्दांचा, भावनांचा खेळ आहे, उच्चारांचा खेळ आहे. गाणे हे सुर, ताल यांचे मिश्रण आहे. मुलांना काव्यांची ओळख आधी करून दिली पाहिजे.
मुलांनी गाण्यासाठी दूर लांबचे उद्दिष्ट ठरविले पाहिजे व त्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. ओळख निर्माण करणे एक वेळ सोपे आहे; परंतु ओळख कायमस्वरूपी टिकवून ठेवणे कठीण आहे. ते महत्त्वाचे आहे. मोठ्या लोकांचा आदर राखणे खूप आवश्यक आहे. कलेचा आदर केला, तर त्या कलाकाराला आदर प्राप्त होतो. या क्षेत्रातल्या कलाकाराने संयम ठेवला पाहिजे. यश मिळाल्यावर हुरळून जाऊ नये. संगीताची भाषा बदलत चालली आहे; परंतु जे भारतीय लोकसंगीत आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे. लोकांना नवीन गीत, संगीत लवकर ऐकायला आवडत चालले आहे. त्यामुळे काही दर्जाहीन गाणी तात्पुरत्या काळासाठी हीट होतात. लगेच लुप्त पावतात. दर्जेदार गाणी, संगीत दीर्घकाळासाठी हीट ठरतात. नंदेशला पुढील वाटचालीसाठी व गायन क्षेत्रातील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!