फिरता फिरता – मेघना साने
दिवाळी आणि नाताळात विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्या तरी सर्वच मुले त्या काळात थिएटरमध्ये बालनाट्य पाहायला जातात असे नाही. कित्येक पालक त्यांना टूरवर फिरायला नेतात किंवा नातलगांच्या घरी नेतात. कितीतरी मुलांनी रंगमंदिर कधीच पाहिलेले नसते. बालरंगभूमी परिषदेने पहिलेवहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात मुलांसाठी आयोजित केले होते. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलम शिर्के आणि त्यांच्या कार्यकारिणीने खूप परिश्रम घेऊन या तीनदिवसीय संमेलनाचे आयोजन केले होते. त्यात मुलांना बालनाट्ये, विविध प्रकारची नृत्ये, लोककला, गीते हे सारे कलाप्रकार विनामूल्य पाहायला मिळणार होते, म्हणून तेथे येणाऱ्या मुलांना खूप उत्साह आणि आनंद वाटत होता. २०, २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या या संमेलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शाळांतील कलाकार मुले बस भरभरून आली होती. रंगमंदिराच्या पायऱ्या चढताना मुलांना एक अभूतपूर्व अनुभव येत होता.
प्रवेशद्वारातून आल्याबरोबर स्वागताला एक सुंदर अशी मोठी रांगोळी होती, तर उजव्या हाताला मोठमोठ्या रंगीत पेन्सिल्सने तयार केलेले कलादालन होते. बागडणाऱ्या लहान मुलांचे कटाऊट्स पायऱ्यांवर लावले होते, तर उजव्या बाजूला खिडक्या असलेली बसच्या कटाऊटमध्ये बसून फोटो काढता येत होता. हे सारे जग आपल्यासाठी तयार केले आहे याचा आनंद मुलांच्या चेहेऱ्यावर दिसत होता.
२१ तारखेच्या उद्घाटन समारंभासाठी सभागृह हाऊसफुल झाले होते. सभागृहात विविध वेषभूषा केलेली मुले दिसत होती. कुणी भाले घेतलेले सरदार, तर कुणी नऊवारी नेसलेल्या छुमकड्या मुली, तर कुणी आदिवासी वेषभूषेत होते. सारे उत्सुकतेने भाषणे ऐकण्यासाठी बसलेले होते. कारण व्यासपीठावर त्यांचे आवडते कलाकार दिसत होते. संमेलनाचे अध्यक्ष नटवर्य मोहन जोशी, उदघाटक डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, सयाजी शिंदे, सुबोध भावे, सविता मालपेकर असे एक से एक लोकप्रिय अभिनेते मुलांशी संवाद साधत होते. सयाजी शिंदे किंवा सुबोध भावेसारखे लोकप्रिय अभिनेते भाषणाला उभे राहिले की मुले ‘हो’ करून आनंद व्यक्त करत होती. नंतर मात्र भाषण शांतपणे ऐकत होती. कारण लहानपणी बालरंगभूमीचा अनुभव असलेल्या या ताऱ्यांनी आपले बालनाट्याचे अनुभव सांगितले. बालनाट्यात काम केल्यामुळेच आपण पुढे आत्मविश्वासाने रंगभूमीवर उभे राहिलो असे मत व्यक्त केले.
उद्घाटनानंतर झालेल्या चर्चासत्रात ‘भविष्यातील बालरंगभूमी’ या विषयावर महाचर्चा होती. त्यात विजय गोखले, मोहन जोशी, मोहन आगाशे, राजू तुलालवार आणि अजित भुरे इत्यादी मान्यवर सहभागी होते. आता सोशल मीडियाच्या वाढलेल्या वापरामुळे मुले बालनाट्याकडे फारशी फिरकत नाहीत. त्यांची आवड आणि मनोरंजनाची कल्पना टीव्हीवरील कार्टून फिल्म्स पाहण्यापुरती सीमित झालेली आहे. पुढील काळात नाटकासाठी कोणते विषय असतील यावरही चर्चा होऊ लागली. तेव्हा ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे म्हणाले,”तुम्ही आम्ही सर्व आता जुन्या पिढीतील माणसे आहोत. समोर हे जे बसलेले आहेत तेच पुढे लेखक, दिग्दर्शक होणार आहेत. पुढील काळात कोणते विषय असावेत हे तेच ठरवतील. आपण त्याची चिंता करण्याचे कारण नाही.”
दुपारच्या सत्रात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुलांच्या समूहांनी आपले कलासादरीकरण सुरू केले. यात बरीचशी समूहनृत्ये ध्वनिमुद्रित गाण्यांवर होती, तर काही समूहांनी पेटी, तबला इत्यादी वाद्यांच्या साहाय्याने गाणी सादर केली. प्रत्येक समूहाचे सादरीकरण बिनचूक आणि उत्कृष्ट होते. सर्वात कमाल केली ती कर्णबधिर मुलांच्या समूहाने! एकूण पन्नास कर्णबधिर मुले व्यासपीठावर एका तालात नाचत होती. सर्वांच्या हालचाली एकसारख्या होत होत्या. पण आश्चर्य म्हणजे पार्श्वभूमीवर वाजणारे संगीत या मुलांना ऐकू येतच नव्हते. त्यांचे शिक्षक समोर उभे राहून बोटांच्या आणि तळव्याच्या हालचालीने त्यांना मार्गदर्शन करत होते.
सर्व मुलांचे डोळे त्या शिक्षकाकडे होते. केवळ पाहून एवढे गतिमान आणि अचूक तालात नृत्य करणाऱ्या या मुलांना प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. या सत्रात काही विधिनाट्ये सादर झाली. शेतकरी किंवा आदिवासी यांच्या चालीरीती निवेदिकेने समजावून दिल्या. एका समूहाने डोक्यावर पोपट घेतले होते. अर्थात हे पुठ्ठ्याचे पोपट मुलांनीच तयार केले होते. पण अगदी खरे वाटत होते. काही जमातीत पोपटांना देव मानतात आणि लग्नप्रसंगी असे नृत्य करतात असे निवेदिकेने सांगितले.
२२ तारखेला झालेल्या परिसंवादात अध्यक्ष नीलम शिर्के यांनी पुढाकार घेऊन बालरंगभूमीच्या संदर्भात असलेल्या आव्हाने व समस्यांवर चर्चा सुरू केली. व्यासपीठावर मध्यभागी बालरंगभूमीच्या महाराष्ट्रातील शाखांचे कार्यकर्ते बसले होते, तर उजव्या बाजूला मुले आणि डाव्या बाजूला शिक्षक बसले होते. संपूर्ण सभागृह मुलांनी व पालकांनी फुलून गेले होते. त्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना या चर्चेत आपले मत मांडता येत होते. मुलांना बालनाट्यासाठी कोणते विषय आवडतील हे मुलांनी मोकळेपणे सांगितले. बालरंगभूमी त्यासाठी काय योजना करेल हे कार्यकर्ते सांगू लागले. शिक्षकांच्या मते नाटके ही मुलांवर संस्कार करणारी आणि त्यांचे प्रबोधन करणारी असावीत. काही मुलांनी स्पष्टपणे सांगितले की पालकांना आमच्याशी संवाद साधायला वेळ नसतो, ते नेहेमीच घाईगडबडीत असतात किंवा त्यांची उत्तरे अशी असतात की आमची वाचाच बंद होते. त्यामुळे आम्हाला मित्रच जवळचे वाटतात. पालकांनी मुलांशी मित्रासारखे बोलावे असे सांगताना नीलमताई म्हणाल्या की या बाबतीत बालरंगभूमी समुपदेशन सत्र आयोजित करू शकेल. बालनाट्य लेखन आणि दिग्दर्शनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राजू तुलालावर यांनी आपले अनुभव सांगितले. ते म्हणाले की, कोणत्या विषयावर नाटक लिहायचं हे शिबिरात मुलेच मला सांगतात.
बालरंगभूमी परिषदेच्या शाखा महाराष्ट्रभर असल्यामुळे सातारा, बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, कोल्हापूर, अकोला, परभणी, नागपूर, धुळे, जालना, पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, सोलापूर, मंगळवेढा, अहिल्यानगर, नंदुरबार, पंढरपूर, रत्नागिरी, लातूर, इचलकरंजी, नाशिक या शाखांनी मुलांचे कार्यक्रम बसवून सादर केले. आमच्या ठाणे शाखेच्या मुलांनी गायन व नृत्य सादर केले. त्यासाठी हेमंत साने यांनी कवी एकनाथ आव्हाड, कुसुमाग्रज यांची नवीन बालगीते संगीतबद्ध केली होती.