Friday, July 11, 2025

ऐन थंडीत परळ,भायखळा, दादर, पवई, अंधेरीत पावसाचा शिडकावा

ऐन थंडीत परळ,भायखळा, दादर, पवई, अंधेरीत पावसाचा शिडकावा

मुंबई : गेले दोन तीन दिवस मुंबईतील तापमानात बऱ्यापैकी घट झाली असल्याने पहाटे तसेच रात्री गारवा जाणवत आहे. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री शहर तसेच उपनगरांत पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आजदेखील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.


मुंबईत गेले दोन तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण, धुके आहे. परिणामी मुंबईतील धुरक्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. मुंबईमध्ये या धुरक्यामुळे सर्वदूर प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा अंदाज वर्तवला नसला तरी, शुक्रवारी मध्यरात्री तसेच पहाटे परळ,भायखळा, दादर, पवई, अंधेरी परिसरात पावसाचा शिडकावा झाला.



दक्षिण केरळ लगत अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे आणि पश्चिमी चक्रावात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहील. तसेच पावसाला देखील पोषक वातावरण तयार झाले आहे, असे हवामान विभागाने सांगितले. दरम्यान, पुढील दोन तीन दिवस मुंबईत पहाटे दाट धुके पहायला मिळेल. तसेच संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >