भालचंद्र कुबल – पाचवा वेद
२०२४ साल संपल्यात जमा असल्याने गेल्या वर्षभरातील नाट्यसृष्टीत घडलेल्या ठळक घटनांचा आढावा या लेखाच्या निमित्ताने घ्यावा असा विचार केला आणि विश्वासच बसेना की, १०० वे नाट्यसंमेलन मागच्या जानेवारीत पार पडले होते? काल-परवा हे संमेलन घडून गेल्यासारखे अजूनही वाटते आहे. शिवाय उदय सामंत यांनी जाहीर केलेले रत्नागिरी येथे होणारे सांगता संमेलन अजून झालेले नाही, त्यामुळे १०० वे सूप वाजले असे खऱ्या अर्थी म्हणता येणार नाही. काही नाट्यविद्वानांनी १०० वे नाट्यसंमेलन हे वर्षभर चालले असाही दावा केला आहे. पण काहीही असो, चिंचवडकरांचे अथक प्रयत्न कामी आले आणि शतकी संमेलनाचे आयोजन यशस्वी झाले. तब्बल ५ वर्षांचा गॅप मधल्या कोविडकाळामुळे पडला होता. ८ रंगमंच आणि ६४ कलाविष्कार दाखवणारे ६८ हून जास्त कार्यक्रम, हजारो कलाकारांच्या उपस्थितीत सादर झाले. मराठी चित्रपट नाट्य संगीत क्षेत्रातील भव्य नाट्ययात्रा, दुसऱ्या दिवशीची नाट्यदिंडी, भव्य उद्घाटने आणि संमेलन हस्तांतरण (सांगता) सोहळा हे शासकीय इतमामात झालेले कार्यक्रम या शिवाय नाटके, संगीत रजनी वगैरे कार्यक्रमांची रेलचेल, तर प्रेक्षकांची दमछाक करणारी होती. २०२४ ची सांस्कृतिक सुरुवातच ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत दणदणीत संमेलनाने झाली. संमेलनाध्यक्ष म्हणून डाॅ. जब्बार पटेल यानी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
२५ जानेवारीला पुलंच्या मॅड सखाराम या दुर्लक्षित नाटकाचे मंगेश सातपुतेंच्या दिग्दर्शनाद्वारा पुनरागमन झाले. दुर्लक्षित यासाठी म्हटले की सदर संहिता छापिल स्वरुपात असूनही आजवर तो प्रयोग दीर्घांक असल्याच्या तांत्रिक कारणावरून आणि तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडर या जगविख्यात नाटकाची ती ‘पॅरेडी’ असल्याने, उगाच लफडी नकोत, या सेफ अॅटीट्युडमुळे ते मागे राहिले असावे; परंतु सद्य स्थितीत सोनाली कुलकर्णी सारख्या संवेदनशील व सक्षम अभिनेत्रीने या नाटकाची धुरा हाती घेऊन, विविध रंगमंचांवर या नाटकाचे प्रयोग सुरू ठेवले आहेत. एखाद्या रंगकर्मीने एखादे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली धडपड यंदाच्या नाट्यवर्षासाठी सकारात्मक बाब ठरली.
फेब्रुवारीच्या सुरुवातीस ९२ वर्षांचे सिनेदिग्दर्शक राजदत्त व ७६ वर्षांचे नाट्यकर्मी अशोक सराफ यांना अनुक्रमे केंद्र शासनाचे पद्मभूषण व महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा जागतिक नाटक दिवस सोहळा सादर करणारी “अवतरण अकादमी” ही मुंबईतील एकमेव मराठी संस्था होती. एन.सी.पी.ए. २०२४ पासून पुन्हा एकदा मराठी नाटकांच्या वावरामुळे गजबजू लागले. लोककलेच्या समृद्धीसाठी शिबीर घेऊन त्यातून दत्ता पाटील यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘कलगीतुरा’ या समांतर नाटकाची निर्मिती, तरुण मराठी रंगकर्मींसाठी ऊर्जा निर्माण करणारी बाब ठरत आहे आणि याचे श्रेय राजश्री शिंदे या ध्येयाने झपाटलेल्या व एन.सी.पी.ए. साठी झोकून देऊन काम करणाऱ्या मराठी तरुण नाट्यकर्मीचे आहे. बालरंगभूमीसाठी वेगळ्या पद्धतीचे शाळांमधून घडवून आणलेले वर्कशाॅप्स असो वा संगीत तथा नृत्याबाबतचे वर्कशाॅप्स असो, पुन्हा एकदा मराठीतून किलबिलाट तिथे ऐकू येऊ लागलाय. २०२४ मधे एन.सी.पी.ए. द्वारा प्रतिबिंब या बहुभाषिक नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले गेले. दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे अभिनित पत्रापत्री या नाटकाचा शुभारंभ या महोत्सवात झाला. तसेच नवलेखकांसाठी याच महोत्सवात लेखन शिबिरातून लिहिल्या गेलेल्या पाच संहिता लवकरच प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहेत.
सप्टेंबर २०२४ मध्ये राज्य शासनाद्वारे दिले जाणारे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धीसागर यांना, तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना देण्यात आला. शिवाय राज्य सांस्कृतिक पुरस्कार विशाखा सुभेदार, सोनिया परचुरे, शाहीर राजेंद्र कांबळे आदी कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या दहा जणांना देण्यात आला. यंदाच्या वर्षी राज्य शासनाने २३ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक धोरण जाहीर करून भारतातील एकूण राज्यात महाराष्ट्र अग्रेसर असल्याची साक्ष कलावंत तथा रंगकर्मींना पटवून दिली. पुरोगामी महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने विवेचन करायचे झाल्यास सांस्कृतिक धोरणांद्वारे ठरविली गेलेली दिशा पुढील अनेक पिढ्यांना सृजन आणि सक्षम करणारी असेल याची ग्वाही तात्कालिक सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यानी शासन निर्णयाद्वारे जाहीर केली.
यंदाची ६२ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा, अंतिम फेरी गोवा केंद्रावरील “फादर” या नाटकाने गाजवली. पहिल्या तीनमध्ये पहिले व तिसरे नाटक एकाच पाश्चिमात्य नाटकाचे रूपांतरण असल्याने निकालाबाबत स्पर्धकांची परीक्षकांबाबत नाराजी दिसून आली. मात्र यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या आयोजनात स्पर्धकांच्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होताना दिसत असल्याने यंदा तक्रारीला वाव नसेल, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
व्यावसायिक रंगभूमीला कोविड काळामुळे आलेली अवकळा काही ठोस व निश्चित ठोकताळ्यांमुळे नष्ट होऊन नाट्यनिर्मिती स्थिरावल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आटोपशीर नाटके प्रेक्षक स्वीकारत आहेत. भव्य-दिव्य नाटकांना निर्मात्यांनी आवर घातल्याचे दिसत आहे. टीव्ही मालिकातील नटमंडळीना घेऊन केलेली नाट्यनिर्मिती प्रेक्षक स्वीकारतात, हा समज २०२४ ने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला. कुर्रर्रर्र, ज्याची त्याची लवस्टोरी, विषामृत, वरवरचे वधूवर, थेट आमच्या घरातून सारखी हलकी फुलकी काॅमेडी मालिकांमधली नटमंडळी गर्दी खेचत आहेत. २०२४ मध्ये दखल घ्यावा, असा नाट्यप्रकार प्रकर्षाने छोटे खानी थिएटरमधून सादर होताना दिसला तो म्हणजे, एकल नाट्याचा…! एकपात्री नाट्यप्रयोग सादरीकरणाचे प्रयत्न या अगोदर बऱ्याच वेळा झाले आहेत; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती फक्त याच वर्षी झाली. मन, सांगत्ये ऐका, शुद्धता गॅरेंटेड, छोटी डायरी अशी अनेक नावे या निर्मितीच्या निमित्ताने घेता येतील. त्यामुळे एकल नाट्य आणि दीर्घांक असे समीकरण या प्रयोगांमुळे “फिक्स” झाले आहे.
काही नाट्यप्रयोग या वर्षी वेगळे मार्ग अवलंबताना दिसून आले. प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीच्या मध्येही एखादा नाट्यप्रकार जन्मास घालता येतो, याची शाश्वत संकल्पना मांडणारी, गोष्ट संयुक्त मानापमानाची, आजीबाई जोरात, गटार, दोन वाजून २२ मिनिटांनी, असेन मी नसेन मी, इवलेसे रोप, उर्मिलायन ही नाटके वेगळी म्हणावी लागतील. पुनरुज्जिवित नाटकांपैकी आॅल दि बेस्ट, देवबाभळी, वस्त्रहरण, सुर्याची पिल्ले, नकळत सारे घडले, पुरुष अशी नाटके रंगमंचावर रुजू झाली, तर चारचौघी, कोण म्हणतं टक्का दिला, खुर्च्या, हिमालयाची सावली ही नाटके दुसऱ्या इनिंगमध्ये बंद झाली. यंदा एकांकिकांचे पीक अमाप असल्याने एकांकिका स्पर्धाही जोरात आहेत. यंदाच्या चतुरंग आयोजित अंतिमांची अंतिम सवाई एकांकिका स्पर्धेला टफ फाईट असणार आहे. असे जरी असले, तर विशेष नमुद करावी असे वेगळेपण मिरवणारी एकही एकांकिका चोखंदळ प्रेक्षकांसाठी यंदाच्या यादीत नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागेल. नाटकांशी संबधित असलेल्या दोन पुरस्कार सोहळ्यांनी आपल्या लोकप्रियतेवर मोहोर उमटवली; पैकी मानाची पुरस्कार सोहळा व सांस्कृतिक कला दर्पण या दोन सन्मान संध्यांची नावे घेता येतील. मानाचीतर्फे नाटककार सुरेश खरे यांचा सांस्कृतिक कला दर्पणतर्फे बाळ धुरी व उषा नाईक यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती अभिवाचन महोत्सव आणि बोधी नाट्य परीषदेने आयोजित केलेली ४७ वी नाट्यलेखन कार्यशाळा त्यात वाचल्या गेलेल्या नव्या संहितांमुळे गाजल्या. तसेच विशाखा कशाळकर प्रतिष्ठानने यांनी सुरू केलेल्या एकांकिका वाचन महोत्सवाला अनुसरून प्रसिद्ध केले गेलेल्या एकांकिका पुस्तक प्रकाशनाचा एक आगळा उपक्रम यंदा सुरू झाला. प्रेमानंद गज्वींचे आत्मचरीत्र “रंगनिरंग” तसेच डाॅ. सतीश पावडे यांचे नाट्यसमीक्षा व डाॅ. मंगेश बनसोड यांचे रंगविधाही पुस्तके विशेष लक्षवेधी ठरली.
२०२४ संपायला काही दिवस शिल्लक असतानाच बालरंगभूमी वरील पहिले वहिले नाट्यसंमेलन पुणे येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. बालरंगभूमी नाट्यपरीषदेच्या अध्यक्षा अॅड. निलम शिर्के सामंत यांनी बालरंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिभा मतकरी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. २०२४ मध्ये आपण उमेश नामजोशी, विजय कदम, लवराज कांबळी, अतुल परचुरे, क्षितीज झारापकर, दादा परसनाईक, संजय मराठे आदी नाट्यकर्मी गमावले.
दखल घ्यावी असे अनेक परदेश दौरे मराठी नाटकांनी केले. यातील ७५टक्के दौरे अमेरीकेत, प्रशांत दामलेंच्या नाटकांचे १५ टक्के दौरे आॅस्ट्रेलियात व बाकी दुबई, लंडनला केले गेले. कुर्रर्रर्र, ३८ कृष्ण व्हिला, आमने सामने, गेला माधव कुणीकडे, द परफेक्ट मर्डर, खरं खरं सांग, एका लग्नाची पुढची गोष्ट अशी एकाहून एक सरस नाटकांनी फाॅरेन दौरे अनुभवले. थोडक्यात १९९८ला सुरू झालेल्या परदेश दौऱ्यांना २०२४ हे वर्ष सर्वाधिक दौऱ्यांचे ठरले. अशा अनेक घडामोडींचा आढावा या वर्षातील शेवटच्या लेखाच्या निमित्ताने घेता आला. मुंबई बाहेरही नाट्यसृष्टी आहे, त्याची मला जाणीवही आहे; परंतु त्या रंगकर्मींनी केलेल्या प्रयोगांची दखल घेणे गरजेचे असूनही त्या प्रयोगाची इन्फो निदान वृत्तपत्रांपर्यंत तरी पोहोचायला हवी, असे माझे प्रांजळ मत आहे.