भालचंद्र कुबल
आम्ही गेल्या ३० वर्षांपासूनचे वाचक असाल तर प्रत्येकाचे आवडते नाटककार, लेखक होते. पुल, दळवी, कानेटकर, बाळ कोल्हटकरांप्रमाणे तेंडुलकर, आरती प्रभू, प्र.ल.मयेकर अशा अनेक लेखकांनी आपल्या मनात घरं बांधून ठेवली होती. आता नवी पिढी नाटक लिहायला लागलीय. आवड आणि औत्सुक्यापोटी आपण ती बघतोही आहोत; परंतु मला एका हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी पाच नव्या लेखकांची नावे सांगा, तुम्हाला नाही सांगता येणार…! शोधायला गेले, तर याची अनेक कारणे सापडतील; परंतु मुख्य कारण हेच नव्या पिढीच्या लिखाणाचा आपल्याशी ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. नव्या पिढीचे जार्गन्स वेगळे, त्यांचे फंडे त्याहून वेगळे आणि लिंगो तर तुमच्या आमच्या पेरीफेरी बाहेरचीच…! हल्ली दोन टीन एजर्स, मुलगा असो वा मुलगी बोलायला लागले की, आमच्या पिढीला त्यांची भाषा कोलोक्विअल असुनही परग्रहावरची वाटत राहते. ‘आताची पिढी’ असा सारखा हिणवल्यागत उल्लेख केला तरी फार अंतर नसूनही किंबहूना अवघे १५-२० वर्षांचे अंतरही फारच तफावत निर्माण करते आहे की काय ? अशी भीती दोन पिढी दरम्यान वाटू लागली आहे. तरीही अशा पिढीचे लेखक माहीत करून घेण्याची तसदीही आमची पिढी घेत नाही.
वेगवेगळ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांकडे डोळसपणे पाहिले की, मात्र नवे लेखक दिसू लागतात. अशाच एका स्पर्धेत मला घनश्याम रहाळकर गवसला. त्याच्या ‘एएसएल प्लीज’ ही एकांकिकेने जाम भारावल्यागत झालो होतो. पुढे त्यात काही छोट्या-छोट्या करेक्शन्स करून मी तिच एकांकिका मुंबईत “आमची आपली स्पेसच एवढी’ या नावे सादर केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत ती पहिली आली आणि घनश्यामच्या लेखनाची खरी ताकद कळली. साधा सोप्पा कंटेंट, कुठेही नातेसंबंधाची क्लिष्टता नाही, परिस्थितीजन्य भावनिक चढ-उतार नाहीत, क्लायमॅक्सला बँग वाजवा असा अट्टहास नाही, अशा धाटणीचे एखादे नाटक तरुण मंडळी जेंव्हा घेऊन येतात, तेंव्हा त्यांचे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच असते.नुकतेच रंगभूमीवर प्रकाशित झालेले “विषामृत” हे अशाच पठडीतले नाटक…! विशाल आणि अमृताच्या रुटीन नातेसंबंधातून दोघांनाही इमोशनल प्रयोग करायला लावणारे आणि तरुणाईचा ताजेपणा जपणारे नाटक म्हणजे विषामृत. मला विजय केंकरे या दिग्दर्शकाबद्दल कायम प्रश्न पडत आलाय की, ही तरुणाईची नाटके तो मिळवतो तरी कुठून ? त्यांची मागील सलग १०-१५ नाटके काढून पहा, आताच्या पिढीशी असलेला कनेक्ट सातत्याने जाणवत राहतो. आम्ही मास्तरकी करणारे शिकवण्याच्या उद्देशाने येणाऱ्या पिढीबरोबर फिरतो ते वेगळे आणि अखिल तरुणाईची दिशा दर्शवणारे नाटक नावाचे गॅझेट त्या पिढीच्या हातात देणे वेगळे.
यंग जनरेशन नाटकांकडे फिरकत नाही, नाटक हे माध्यम यंग जनरेशनला लेहंदी वाटते, हे सर्व अपसमज पुसून टाकायला लावणारा सद्य स्थितीतला तो एकमेव दिग्दर्शक आहे. खरे तर मी विषामृत हे नाटक घनश्यामकडून तीन वर्षांपूर्वी ऐकले होते. तेंव्हा त्याचे वाचन फार काही प्रभाव पाडू शकले नव्हते. मात्र केंकरेनी इंप्रोवाईज पद्धतीने साऱ्या नाटकाचा प्लाॅट अशा काही रितीने उलगडलाय की तुम्ही ‘हुक’ होताच. घनश्यामच्या लिखाणात गॅलरीतून दिसणाऱ्या आणि प्रचंड दुर्गंधी पसरविणाऱ्या ओढ्याबद्दल किंवा नाला या प्रतिकाबद्दल लिहिणे गरजेचे आहे. हल्लीचे लेखक ही असली प्रतिके-बितिके मानत नाहीत आणि लिहीत तर अजिबात नाही. प्रतिकांचा वापर, भाषिक अलंकारांची पेरणी, भारदस्त अर्थांची जड वाक्ये डायरेक्ट आऊटडेटेड झाली आहेत, अशा परिस्थितीत हा लेखक प्रतिक लिहितो, हाच मुळी धक्का आहे. दुसरा अंक मात्र कमालीचा पकड घेणारा ठरला आहे. पहिल्या अंकात असलेला पात्र निर्मितीचा पसारा थेट कथानकाला प्राधान्य देत एका ठोस विधानापर्यंत कधी आणून सोडतो हे कळत सुद्धा नाही. हे सर्व रसायन इतके एकजीव झालंय की विशालची भूमिका करणारे शुभंकर तावडे आणि अमृताची भूमिका करणारी प्रियदर्शनी इंदलकर याच रोलसाठी जन्माला आलेत असे वाटत राहते. प्रियदर्शनीला हास्यजत्रेत बघितल्यानंतर आणी पुढे ही काय करणार ? हा प्रश्न पडणाऱ्यांना “अमृता” एक कडक सरप्राईज आहे. शुभंकरही तोडीस तोड आहे, दोघांमधली नवरा-बायकोची केमिस्ट्री इतकी सहज आहे, की आपण नाटक बघतो आहोत हे देखील क्षणभर आपण विसरतो. दोघांमधले संवाद आजचे आहेत त्यामुळे आमच्या पिढीला ते बोल्ड वाटू शकतात; पण त्याला इलाज नाही कारण तोच जर नाटकाचा लिंगो असेल, तर आम्हालाही आमची मानसिकता बदलावी लागेल हे अधोरेखित करणारे हे नाटक आहे. आरती मोरे आणि चैत्राली सोपारकर कोहली या दोघी या नाटकाची बाजू इतकी भक्कमपणे सावरून धरतात की या दोघींनाही “फाईडींग आॅफ द इयर” म्हणायला हवे. विशेषतः आरती मोरेची ‘अमॅच्युअर प्रगल्भता’ दृष्ट लागेल इतकी खणखणीत वाजलीय; परंतु शौनक रमेश नामक एक छोट्टसं गालबोट लागलेले आहे.
संदेश बेंद्रेने गॅलरीसाठी डिझाईन केलेला स्लायडींगचा दरवाजा त्यांच्या कल्पकतेची चुणूक दाखवतो. मात्र दोन क्रिएटिव्ह नावांना या नाटकात प्रभावी वाव मिळालेला नाही, ते म्हणजे संगीतकार अजित परब आणि प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे. अशा पद्धतीचे नाटक सद्यस्थितीत बिल्कुल सेफ व्यवसायाचे म्हणता येणार नाही. कारण तरुणवर्ग नाटकांपासून दूर गेलाय आणि ज्येष्ठवर्गाला अशा नाविन्यात रस नाही. तरीही डेरींग करून प्रयोग करू इच्छिणाऱ्या रंगकर्मीना अशा नाटकांबाबत प्रोत्साहन देणाऱ्या राहूल भंडारेना सलाम. दोन-तीन तासांसाठी तरुणाईत प्रवेश करायचा असेल, तर समस्त वयस्कांनो या विषामृताची चव जरुर चाखा…!