गुलमर्गमध्ये कडाक्याच्या थंडीत लष्कराने केली मदत
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग येथे हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची भारतीय सैन्याच्या जवानांनी सुटका केली. भारतीय लष्कराने गुलमर्ग जिल्ह्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याची माहिती ‘चिनार कॉर्प्स’ने आज, शनिवारी दिली. दरम्यान, हवामान विभागाने जम्मू आणि काश्मीरमध्ये ३० डिसेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी होत आहे. जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गमध्ये तुफान हिमवृष्टी होत आहे. तनमर्गचा रस्ता बंद झाल्याने सुमारे १३७ पर्यटक अडकले होते. प्रशासनाने सैन्याला मदतीचे आवाहन केल्यावर लष्कराचे जवान तत्काळ मदतीला धावले. त्यांनी पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. दरम्यान, शुक्रवारी जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हंगामातील पहिल्या हिमवर्षावानंतर जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनागमधील काझीगुंड शहरात सुमारे २ हजार वाहने अडकली असल्याची माहिती शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली.
Jejuri Somvati Yatra : जेजुरीतील सोमवती यात्रेदरम्यान वाहतुकीत मोठे बदल!
चिनार कॉर्प्सने आपल्या ट्विटर (एक्स) पोस्टमध्ये सांगितले की, गुलमर्गच्या पर्यटन स्थळी तुफान हिमवृष्टी झाली. त्यामुळे तनमर्गचा रस्ता बंद झाला होता. अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी नागरी प्रशासनाने आवाहन केले. त्यानुसार १३७ पर्यटकांची सुटका करण्यात आली. यामध्ये ८ बालकांचाही समावेश आहे. तसेच कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने प्रचंड हिमवृष्टीदरम्यान एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखले केले.