मुंबई : देशभरात बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या घुसखोरांना पकडून त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवून असे आश्वासन भाजपाने दिले होते. या घडामोडी पाहता महाराष्ट्रात या घुसखोरांविरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे. काल राज्यात काही ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी करून १३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. हे घुसखोर बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र एटीएसने ही धाडसी कारवाई केली. दरम्यान, महाराष्ट्रात त्यातही मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. त्यामुळे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून बांग्लादेशी लोक महाराष्ट्रात घुसखोरी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे, नवी मुंबई आणि सोलापुरात छापे टाकले. या छाप्यात पथकाने १३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये सात पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. या सर्व घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश मिळवला होता. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या घुसखोरांविरुद्ध विदेशी नागरिक कायदा १९४६, पासपोर्ट कायदा १९५० आणि पासपोर्ट कायदा १९६७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी बांग्लादेशींचा शोध घेण्यात येत आहे. मोठ्या शहरात बांग्लादेशी लोक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. मागील आठवड्यात एटीएसने अशाच प्रकारची धाडसी कारवाई केली होती. या कारवाईत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमधून १७ घुसखोरांना अटक करण्यात आली होती. या १७ जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात बांग्लादेशी लोकांची घुसखोरी वाढली आहे. मुंबई शहरात या घुसखोरांचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. याठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात मिळतो. बांग्लादेशातून येणारे लोक कमी पैशांतही कामे करण्यास तयार असतात. त्यामुळे या लोकांना येथे सहज रोजगार उपलब्ध होतो. विशेष म्हणजे हे लोक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश मिळवत आहेत. यामुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याने या घुसखोरांविरुद्ध आता ठिकठिकाणी धडक मोहिमा सुरू केल्या जात आहेत.