सोलापूर : ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’, हा वाक्प्रचार आपल्याकडे चांगलाच रूढ आहे. सध्या सोलापूर विमानतळाचेही (Solapur airport) कामकाज या वाक्प्रचाराप्रमाणे चालले आहे. विमानतळ पूर्ण क्षमतेने न चालण्याबाबत काही न काही बहाणे शोधणात पटाईत असलेल्या प्रशासनाने आता इंधनाचा नवा बहाणा शोधला आहे.
‘फ्लाय ९१’ या कंपनीकडून गोवा ते सोलापूर व सोलापूर ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. मात्र, इंधनाच्या सुविधेचे निमित्त करत हा मुहूर्त आता जानेवारीत ढकलला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या मागणीची पूर्तता झाल्यानंतरच सेवा सुरू होईल, अशी माहिती विमानतळाच्या सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली.
याआधी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याचा मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे निर्देश दिले होते. सदर चिमणी पाडल्यानंतर आता साखर कारख्यानाचा दुसरा हंगाम देखिल सुरू झाला. तरी अद्यापही सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झालेली नाही.
Chenab railway bridge : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे काम पूर्ण
१५ जून २०२३ रोजी चिमणी पाडण्यात आली. त्यानंतर यंदाचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, विमानसेवा सुरू होण्यासाठी असलेल्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून (डीजीसीए) आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी बराच काळ यामध्ये गेला.
विमानतळावरील विविध दुरुस्त्या आणि नूतनीकरणासाठी सुमारे १६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता विमानतळावर टॅंकरद्वारे इंधन आणून विमानात भरण्यासाठीदेखील पेट्रोलियम मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळाल्यानंतरच सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे जानेवारीत तरी सोलापूर विमानतळ (Solapur airport) सुरु होईल का, असा सोलापूरकरांना प्रश्न पडला आहे.