अवघ्या तीनच दिवसांमध्ये राहूल कर्डिलेंच्या नियुक्तीला ‘ब्रेक’
नाशिक : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी (Nashik Municipal Commissioner) वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची तीन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, भाजपच्या बड्या नेत्याच्या नाराजीमुळे राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक लागल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. आता राहुल कर्डीले यांची नाशिक महापालिका आयुक्तपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांची मनपा आयुक्तपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षात नाशिक महापालिकेला तीन वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नाही. त्याचा थेट परिणाम नाशिकच्या विकासावर झाल्याचे दिसून येत आहे. डॉ. अशोक करंजकर यांनीही राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेच्या कारभारातून अंग काढून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यात दोन निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे कारभार पूर्णपणे भरकटला होता. त्यामुळे नाशिकसाठी आयएएस अधिकारी द्यावा, अशी मागणी सातत्याने जोर धरत होती.
Girish Mahajan : गिरीष महाजन यांनी स्वीकारला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रीपदाचा कार्यभार
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली
त्यामुळे महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे नाशिक आयुक्तपदाची धुरा सोपवली होती. मात्र, भाजपच्या एका बड्या मंत्र्याने आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची गळ घातल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. यामुळे नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी राहुल कर्डिले यांना भोवली आहे. राहुल कर्डीले यांची नाशिक महापालिका आयुक्तपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. राहुल कर्डिले हे मसूरी येथे ट्रेनिंगला गेलेले आहेत. मात्र या ट्रेनिंग दरम्यानच नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मनपा आयुक्तपदी नियुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले जात होते. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने मनीषा खत्री यांच्या नाशिक महापालिका आयुक्त पदाचे निर्देश दिले आहेत.