संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ समोर
कझाकिस्तान : कझाकिस्तानमध्ये विमानाचा भीषण अपघात (Kazakhstan Plane Crash) घडल्याचे समोर आले आहे. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात असताना लँडींगदरम्यान विमानाचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून सदर घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अझरबैजानी प्रवासी विमान बाकूहून ग्रोंजीला जात होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. परंतु विमान लँडिंग करत असताना ते धावपट्टीवर जोरात कोसळले अन् एका क्षणात विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
रशियन वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. त्यानुसार, अपघात झालेल्या विमानात ६७ प्रवासी आणि ५ क्रू मेंबरचा समावेश होता. यामधील ३८ जणांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलासह २९ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. तर सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर तज्ज्ञ, ट्रॉमाटोलॉजिस्ट, न्यूरोसर्जनसह सर्व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच एअर ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.