ख्रिसमस हा सण फक्त एका उत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो प्रेम, शांतता आणि आनंदाचा संदेश देतो. जगभरात २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस साजरा करण्यामागील मूळ कथा काय आहे? येशू ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित या सणाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.
हजारो वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. नाझरेथ नावाच्या शहरात, मरियम नावाची एक तरुणी राहत होती. एके रात्री मरियम झोपली असताना, देवाने तिच्या स्वप्नात गॅब्रिएल नावाच्या देवदूताला पाठवले. त्याने मरियमला सांगितले की ती लवकरच एका पवित्र आत्मा असलेल्या एका मुलाला जन्म देईल, ज्याचे नाव ती येशू ठेवेल. मरियमने आपल्या साथीदार जोसेफला ही गोष्ट सांगितली तेव्हा निंदेच्या भीतीने जोसेफने ही बातमी ऐकताच मरियमपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे समजताच देवाच्या त्याच देवदूताने जोसेफला त्याच्या स्वप्नात भेट दिली आणि त्याला सांगितले की मरियम पवित्र आत्म्याला जन्म देईल. म्हणून, त्याने मरियमशी लग्न केलं पाहिजे आणि तिच्याबरोबर राहिलं पाहीजे.
ख्रिसमसचा प्रारंभ
ख्रिसमसचा संबंध थेट येशू ख्रिस्ताच्या जन्माशी आहे. ख्रिस्ती धर्मानुसार, येशू ख्रिस्त यांचा जन्म सुमारे २००० वर्षांपूर्वी इस्रायलमधील बेथलेहेम या छोट्याश्या गावात झाला. बायबलमधील उल्लेखानुसार, मरियम (मेरी) यांना देवाचा संदेश आला की, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे मुलगा होणार आहे, ज्याचे नाव येशू असेल. येशू म्हणजे “जगाचा तारणहार” किंवा “ईश्वराचा पुत्र.”
येशूच्या जन्माची कथा
मरियम आणि यूसुफ (जोसेफ) येशूच्या जन्मावेळी बेथलेहेमला गेले होते, कारण त्या वेळी रोमन सम्राट ऑगस्टसने कर जमा करण्यासाठी लोकांना त्याच्या मूळ गावी जाण्यास सांगितलं होत. बेथलेहेममध्ये गर्दीमुळे त्यांना कुठेही निवारा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी एका गोठ्यात आश्रय घेतला, आणि तेथेच येशूचा जन्म झाला. येशूच्या जन्मावेळी आकाशात एक तेजस्वी तारा चमकत होता, जो जगाला या तारणहाराच्या आगमनाची माहिती देत होता. याच ताऱ्याच्या मार्गदर्शनामुळे तीन ज्ञानी राजे (थ्री वाइज मेन) येशूला भेटण्यासाठी आले. त्यांनी येशूला सोने, लोभान, आणि गंधरस ही मौल्यवान भेटवस्तू दिल्या.
ख्रिसमस साजरा कधी सुरू झाला?
येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबरला झाला की नाही, याबाबत स्पष्ट पुरावे नाहीत. तथापि, चौथ्या शतकात रोमच्या सम्राट कॉन्स्टंटाइन यांनी २५ डिसेंबरला येशूचा जन्मदिन साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस त्या काळी सूर्य देवतेच्या पूजेचा दिवस म्हणून ओळखला जात असे. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी २५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्ती सणासाठी निवडण्यात आला.
ख्रिसमस ट्रीचा इतिहास
ख्रिसमस सणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ख्रिसमस ट्री. या झाडाचा उगम १५व्या शतकात जर्मनीमध्ये झाला, जिथे लोक देवाची पूजा करण्यासाठी झाड सजवत असत. नंतर, ही प्रथा युरोप आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये लोकप्रिय झाली. ख्रिसमस ट्री आज आनंद, प्रेम, आणि एकतेचे प्रतीक मानले जाते.
ख्रिश्चन बांधवांची भेट
ख्रिसमसच्या दिवशी लोक प्रभूची स्तुती करण्यासाठी गाणी गातात. ते घरोघरी जाऊन प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देतात. ख्रिसमस ट्री (christmas tree) आपल्या वैभवासाठी जगभरात लोकप्रिय आहे. लोक त्यांची घरे ख्रिसमस ट्रीने सजवतात. चर्च मास नंतर लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने एकमेकांची भेट घेतात. या दिवशी ख्रिश्चन बांधव मेजवानी देतात आणि एकमेकांना शुभेच्छा, तसेच भेटवस्तू देतात. यातून ते शांतता आणि बंधुतेचा संदेश देत असतात.