Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखShyam Benegal : एका अध्यायाला पूर्णविराम...

Shyam Benegal : एका अध्यायाला पूर्णविराम…

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीची न भरून येणारी हानी झाली आहे. बेनेगल यांना भारत सरकारने १९७६ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. श्याम बेनेगल हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका टेलिव्हिजनला दिल्या. बेनेगल यांना भारत सरकारने १९७६ ते १९९१ सालामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या गेलेल्या श्याम बेनेगल यांची ओळख काही भारतापुरती सीमित नाही, तर जगभरातील विविध मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचे चित्रपट दाखवले गेले आहेत. दादासाहेब फाळके यांनी भारतामध्ये सिनेमांची मुहुर्तमेढ रोवली आणि भारतीय चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला आध्यात्मिक आणि मनोरंजनावर आधारित चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. यानंतर काही स्वातंत्र्य चळवळीला चालना देणारे आणि सामाजिक वास्तव दाखविणारे सिनेमेही येऊ लागले. पण पुढे चित्रपटामध्ये मुख्यत्वे मनोरंजन हा एकच बाज कायम राहिला आणि प्रेक्षकांनीही त्याला डोक्यावर घेतले. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात सामाजिक भान देणारी आणि वास्तववादी चित्रपटे येत होती. सत्यजीत रे, बिमल रॉय, व्ही. शांताराम, गुरु दत्त, कैफी आजमी, बलराज सहानी या सारख्या दिग्दर्शक आणि कलाकारांनी आपल्या चित्रपटांतून समाजाचे वास्तव समोर आणणे चालू ठेवले होते, पण यानंतर ७०-८० च्या दशकात शाम बेनेगलसारखा तरुण दिग्दर्शक येऊन अशा सामाजिक चित्रपटांना नवा आयाम देत समांतर चित्रपटांची चळवळच सुरू केली.

मनोरंजनावर आधारलेल्या प्रस्तापित सिनेमांना छेद देत बेनेगल यांनी समांतर चित्रपटांच्या युगास प्रारंभ केला. भारतामध्ये ज्या दिग्दर्शकांनी समांतर चित्रपटाची चळवळ सुरू केली त्यामध्ये श्याम बेनेगल यांचे नाव आघाडीने घ्यावे लागेल. चित्रपट हाच ध्यास आणि चित्रपट हाच श्वास या ध्येयाने श्याम बेनेगल यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला. सुरुवातीला शाम बेनेगल यांची उसकी रोटी, भुवन शोम, सारा आकाश या सारखी चित्रपटे आली होती. पण, ‘अंकुर’ हा चित्रपट माईल स्टोन ठरला आणि समांतर चित्रपटांची मुहुर्तमेढ रोवली गेली. या समांतर चित्रपटांमध्ये कोणी निर्माता पैसे गुंतविण्यास तयार होत नसत. म्हणून असे चित्रपट बनविण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट फायनान्स महामंडळाकडे जावे लागे. आता सरकार चित्रपट बनविण्यासाठी पैसे देणार म्हटल्यावर त्यामध्ये हस्तक्षेपही आलाच. म्हणून शाम बेनेगल यांनी आपले चित्रपट स्वत: बनविण्यासाठी जाहिरात संस्था काढली. जाहिरात बनवून आलेला पैसा ते चित्रपटांमध्ये गुंतवत असत. ‘अंकूर’, ‘निशांत’, ‘भूमिका’ ही चित्रपटे त्यांनी या पद्धतीने बनवली. यानंतर त्यांनी काही सहकारी संस्थांकडून मदत घेऊन ‘आरोहन’, ‘सुसमन’ आणि ‘अंतर्नाद’ सारखी चित्रपटे निर्माण केली. श्याम बेनेगल यांच्या जाण्याने भारतातील समांतर चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री शबाना आझमी यांनी याबाबत त्यांच्या इंस्टाग्रामवर वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले होते. श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ मध्ये सिकंदराबाद येथे झाला. कॉपी रायटर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर आपल्या मेहनतीने आणि कामाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे स्थान मिळवले. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही.

श्याम बेनेगल यांनी १९७४ मध्ये त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची सुरुवात केली. ‘अंकुर’ नावाच्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. हा त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट होता. १९८६ मध्ये त्यांनी टीव्हीच्या दुनियेतही प्रवेश केला. त्यांनी ‘यात्रा’ ही मालिका दिग्दर्शित केली. त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘मंडी’, ‘कोंडुरा’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. केवळ चित्रपटच नाही तर ‘भारत एक खोज’ सारखी मालिका असो किंवा संविधानाच्या निर्मितीवर तयार केलेला माहितीपट असो या सगळ्याला अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जगभरातील चित्रपट विषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांमध्ये श्याम बेनेगल यांचे नाव अगत्याने घेतले जाते. तिथे त्यांचे चित्रपट अभ्यासक्रमाचा भाग आहेत. बेनेगल यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक मौल्यवान अभिनेते आणि अभिनेत्री दिल्या. ज्यात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, गिरीश कर्नाड, शबाना आझमी, स्मिता पाटील यांसारखे दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटांशिवाय दूरदर्शनवरील ‘भारत एक खोज’ आणि ‘कहता है जोकर’, ‘कथा सागर’ या प्रसिद्ध मालिका श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केल्या. बेनेगल यांनी त्यांचे गुरू सत्यजित रे आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही डॉक्युमेंट्री बनवल्या. शाम बेनेगल यांनी असे चित्रपट बनवले की जे फक्त त्या किंवा आजचा काळासाठी नव्हे, तर प्रत्येक काळात प्रासंगिक राहतील. ५० वर्षांपूर्वी त्यांनी बनविलेला चित्रपट आज ही पाहताना आजचा काळाशी तो चित्रपट सुसंगत वाटतो. आजही तेच वास्तव आपल्या शेजारी असल्याचे आणि आपण भोगत असल्याचे जाणवते. हीच त्या दिग्दर्शकाच्या कलेची हातोटी आहे, जी सर्वच काळात दिशादर्शक ठरते.

शाम बेनेगल यांना सत्यजीत रे यांचा वारसदार मानले जात होते. सत्यजीत रे यांच्याकडून धडे घेणाऱ्या शाम बेनेगल यांनी ते सिद्धही करून दाखवले आहे. सत्यजीत रे यांच्या पाथेर पांचाली पाहून बेनेगल यांना आपणही चित्रपट बनवावे, असे वाटले. आधी चित्रकार होऊ इच्छिणारे बेनेगल पुढे दिग्दर्शक बनले. वडिलांच्या व्यावसायिक कॅमेराद्वारे एक छोटी फिल्म बनवली आणि आपला प्रवास सुरू केला. चित्रपटांविषयी विविध मॅगझिन आणि वृत्तपत्रांमधून वाचून त्यांनी आपली प्रतिभा वाढवली आणि चित्रपट बनविणे चालू केले. ‘आक्रोश’, ‘तमस’ आणि ‘पार्टी’ सारखे चित्रपट बनवताना सिनेमॅटोग्रामर म्हणून बेनेगल यांच्यासोबत काम करणारे गोविंद निहलानी यांनी त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या सर्व लोकांबरोबर काम करताना बेनेगल हे या कलाकारांना, सहकाऱ्यांना नकळतपणे घडवत होते. आजही हे मोठे कलाकार शाम बेनेगल यांनी आपणास कसे घडवले, हे फार आदराने सांगतात. आता श्याम बेनेगलरुपी चालताबोलता इतिहास आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -