Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणNarayan Rane : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण झालेच पाहिजे

Narayan Rane : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण झालेच पाहिजे

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे (mumbai goa highway) काम युद्ध पातळीवर हातात घेऊन दर १५ दिवसांनी आढावा बैठक घेऊन मला माहिती द्या आणि येत्या एप्रिलपर्यंत महामार्गाचे काम झाले पाहिजे, अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग अधिकाऱ्यांना केल्या. आपण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आजच बोललो असून आवश्यकता वाटल्यास त्यांचा दौरा इथे लावू असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी आज रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे रत्नागिरीत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्ग आणि मिऱ्या-नागपूर महामार्गाचा यावेळी खासदार राणे यांनी प्राधान्याने आढावा घेतला. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे व्यापारी, व्यावसायिक, पर्यटक, सामान्य वाहन चालक या सगळ्यांनाच त्रास होतो आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्रश्नांना आम्ही काय उत्तरे द्यायची, हा प्रश्न आहे. अधिकारी म्हणून कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. जो दिरंगाई करतो त्याच्यावर कारवाई करा, नाहीतर गडकरी साहेबांना बोलावून त्याच्यावर जागेवर कारवाई करायला सांगावे लागेल. येत्या एप्रिलपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी १५ दिवसांनी आढावा बैठक घ्या, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना केल्या.

Rahul Gandhi vs Devendra Fadnavis : राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले, जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करणे, हेच राहुल गांधींचे ध्येय

रत्नागिरीतील विमानतळाचे काम काही केंद्रीय मंजुरींसाठी थांबले आहे, असे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत आपण लक्ष घालतो आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ, असे खासदार राणे यांनी सांगितले.

जयगड येथील जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे तेथील विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाची आणि त्यावर कंपनीने घेतलेली भूमिका प्रशासनाने केलेली कारवाई याची माहिती खासदार राणे यांनी घेतली.

चिपळूण येथील वाशिष्ठी व राजापूर येथील अर्जुना नदीतील गाळ उपशाबाबत मार्चअखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देश देतानाच अर्जुना नदी पात्रात मोठ्या पुलानजीक टाकण्यात आलेला भराव व गाळ तत्काळ काढण्याच्या सूचना श्री. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. चिपळूण येथील पूरपरिस्थिती आणि वारंवार होणारी पूरहानी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात कोणतेही काम, व्यवसाय यांना हरकती घेणे, ते बंद पाडणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. ते घडू नये यासाठी प्रशासनाने प्रसंगी कठोर कारवाईची भूमिका घेतली पाहिजे. विकासाच्या आड कोणीही असो कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असोत, त्यांना योग्य प्रकारे समजावून तरी पटले नाही तर कारवाईचा बडगा उगारून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी एक ठोस भूमिका बजावली पाहिजे, अशा सूचना यावेळी राणे यांनी दिल्या.

बैठकीत श्री. राणे यांनी जिल्ह्यातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांबाबतचाही आढावा घेतला. दहावी आणि बारावीचे निकाल चांगल्या प्रकारे लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत, असे राणे यांनी यावेळी नमूद केले. बारावीनंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा नेमका कल कोठे आहे याकडे लक्ष ठेवून त्यादृष्टीने भविष्यात शासकीय व खासगी इंजिनीअरिंग व वैद्यकीय कॉलेज व अन्य शैक्षणिक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहेत का, याबाबतचा विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्य सुविधेबाबत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड ते राजापूर या दोन्ही टोकांना मध्यवर्ती असे रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे; मात्र यातील अंतराचा विचार करता अन्य तालुक्यात कोठे शासकीय वा खासगी रुग्णालयाची आवश्यकता आहे का, याचे सर्वेक्षण करतानाच यासाठी शासकीय व खासगी रुग्णालय निर्मितीबाबत भविष्यात आराखडा तयार करण्याच्या सूचना श्री. राणे यांनी दिल्या. याबाबतचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राजापूर तालुक्यात वाटूळ येथे प्रस्तावित असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या उभारणीबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी या दृष्टीने लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यात केंद्र शासनाशी निगडीत असलेल्या योजनांतर्गत निधीसाठी आपण केंद्र शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही देतानाच याबाबतचे प्रस्ताव तयार करावेत. पुढील दर महिन्याला याबाबतचा आढावा आपण घेणार असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -