मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; छगन भुजबळ यांना सोबत घेण्याचेही दिले संकेत
पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी हिंसाचारात मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, ”राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये, जाती-जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम राहुल गांधी करतात. हेच त्यांचे ध्येय आहे. अनेक वर्षांपासून ते हेच करत आहेत”, असे चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”महाराष्ट्राचे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. या चौकशीतून सत्य बाहेर येईल. यात लपवण्याचे कोणतेही कारण नाही. या चौकशीत जर सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले, तर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही कुणालाही सोडणार नाही”, असेही ते म्हणाले.
सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करून त्याची हत्या केली आहे’, असा आरोप त्यांनी केला होता.
तसेच सोमनाथ सुर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला असून त्याला मारहाण करण्यात आली आहे. दलित आहे म्हणून सोमनाथ सुर्यवंशीची हत्या करण्यात आली. पोलिसांनीच त्याला मारले आहे. या घटनेला आरएसएसची विचारधारा जबाबदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटे बोलले आहेत”, असे देखील राहुल गांधी म्हणाले होते.