नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २४ पासून २९ डिसेंबरपर्यंतच्या काळात अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात परस्परांच्या हितांशी संबंधित विषयांवर तसेच बांगलादेश प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे. एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यात भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील तसेच भारताच्या शिष्टमंडळाचेही नेतृत्व करतील. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात लागू होणारी कररचना, परस्परांचे आर्थिक हितसंबंध, भारत आणि अमेरिका यांच्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्यात सविस्तर चर्चा होणार आहे.
Narayan Rane : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण झालेच पाहिजे
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना आपापल्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करायचे आहे. यामुळे चर्चेतून आणि परस्पर सामंजस्यातून मार्ग काढला जाईल. भविष्याचा विचार करून दोन्ही देशांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अद्याप सुरू आहे. या संघर्षाच्या काळातही भारत आणि रशिया यांची मैत्री कायम आहे आणि वृद्धिंगत होत आहे. दुसरीकडे भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमध्ये दिवसागणिक परिस्थिती चिघळत आहे. मूलतत्ववाद्यांमुळे बांगलादेशच्या अनेक भागांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. बांगलादेशमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सरकारने शेख हसिना यांना ताब्यात देण्याची मागणी भारताकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय उपखंडातील आणि उपखंडाबाहेरील आंतरराष्ट्रीय विषयांवर भारत आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री चर्चा करण्याची शक्यता आहे.