Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : 'अंबादास तुम लढो,मैं खोके लेके घर जाता हूँ असा...

Eknath Shinde : ‘अंबादास तुम लढो,मैं खोके लेके घर जाता हूँ असा कारभार सुरु’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा सेनेला खोचक टोला

नागपूर : मी मविआ सरकारमध्ये मंत्री होतो. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास यांना कल्पना आहे पण त्यांना बोलता येत नाही. सध्या अंबादास तुम लढो, मैं खोके लेके घर जाता हूँ, असा कारभार सुरु असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेमध्ये करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता खोचक टोला लगावला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, परभणी, बीड, कल्याण असो हे राज्य कायद्याचे आहे. इथे न्याय होणारच आहे. गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. विरोधकांनी खोटेनाटे आरोप न करता जनतेचे प्रश्न सभागृहात मांडाल, ही अपेक्षा होती. सभागृहात कमी परंतु माध्यमांसमोर बोलण्यात विरोधकांनी धन्यता मांडली. आरोपाला आरोपाने नव्हे कामातून उत्तर देऊ, असे त्यांनी म्हटले.

विदर्भात नागपूर अधिवेशनात आपण कशाला आलोय, जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. सरकार आहे परंतु विरोधी पक्षाचे आमदारही त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे असा संदेश लोकांपर्यंत पोहचला पाहिजे नागपूरमध्ये लंडनसारखं वातवरण आहे. काही जण आनंद, पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे राहिले नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाच्या नेत्यांवर टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्रात ज्याने माज केला तो उतरवलाच पाहिजे हे काम सरकार करेल. चुकीला माफी नाही. या राज्यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आयाबहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला माफी नाही, कुणालाही सोडणार नाही हे सरकारचे धोरण आहे. स्वार्थी राजकारणासाठी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. मविआ काळात औद्योगिक गुंतवणुकीत तिसऱ्या नंबरवर होता. आमच्या काळात पुन्हा महाराष्ट्रात नंबर वन आला आहे. देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के महाराष्ट्रात आहे. जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका उद्योग खात्याने काढली. श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते. चांगल्याला चांगले म्हणण्याची वृत्ती असली पाहिजे. कौतुक करता आले नाही तरी चालेल, पण खोटेनाटे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करू नका, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी विरोधकांना केले.

PM Modi : मोदींचा करिष्मा, राहुल गांधी पुन्हा फेलच! सर्व्हेतील निष्कर्ष

आरोपांना कामातून उत्तर देणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले, महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विक्रमी कामे केली. सर्व बंद पडलेल्या योजना सुरु केल्या. जे लोक योजना बंद करत होते, त्या लोकांना जनतेने घरी बसवलं. काम करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जनतेने निवडून दिले. आम्ही पूर्वी सांगत होतो की, आरोपांना आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. आमच्या कामातून आम्ही उत्तर देऊ. आताही आम्ही तेच करणार आहे. लोकांना आरोप नको आहे, विकास कामे हवी आहेत आणि ती आम्ही दिल्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले.

सरकार न्याय देणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणी आणि बीड घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी परभणी आणि बीडसंदर्भात सभागृहात उत्तर दिले आहे. त्या ठिकाणी दोषींवर कारवाई झाली आहे. परभणी आणि बीडमध्ये जे काही झाले त्याबाबत न्याय मिळणार आहे. कारण आमचे हे सरकार न्यायाचे सरकार आहे. त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी सुरु केली आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना चिमटे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटी काढली. ते म्हणाले, जे लोक घरी बसत होते, त्या लोकांना जनतेने आता घरी बसवलं आहे. विकास कामांना त्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते. त्यापूर्वीच्या महायुती सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेवर येताच सर्व योजना सुरु केल्या. आमचे सरकार गतिमान सरकार असल्याचे पुन्हा सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -