सोलापूर : सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता. दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे १२ टायर वाहन क्र-आर.जे-११- जीसी-९११८ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २४ हजार ४९८ किलो वजनाची रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची सुपारी (Betel nut) आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे ६९ लाख ४५ हजार १८३ रुपये इतकी असून, हा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.
सहायक आयुक्त देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन, उर्वरित २४ हजार ४९८ किलो, किंमत ६९ लाख ४५ हजार १८३ रुपयेचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाकडून पुढील कारवाई सुरू आहे.