पर्यटनस्थळासह देवदर्शनासाठी हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ
पुणे : रेल्वे, विमान, मेट्रोनंतर आता पुणेकरांच्या सेवेत हेलिकॉप्टर (जॉय राइड) देखील दाखल झाले आहे. पुण्यातून पर्यटन व तीर्थास्थानासाठी हेलिकॉप्टरच्या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यातील हवाई क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. यामुळे पुणेकरांसह इतर प्रवाशांना आता हेलिकॉप्टरमधून प्रामुख्याने शनिवारवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर, महात्मा फुले मंडई यांसह अन्य काही प्रसिद्ध ठिकाणे पाहता येणार आहेत.
Laxmi Niwas : झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; अर्धा नव्हे एक तास होणार प्रेक्षकांचं मनोरंजन!
मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांच्या सेवेत रोज अंदाजे पाच उड्डाणे होत आहेत. एका जॉय राइडसाठी हेलिकॉप्टरमध्ये सहा प्रवासी असणे अपेक्षित आहे. एक किंवा दोन व्यक्तींसाठी जॉय राईडसाठी उड्डाण घेतले जात नाही. प्रवासी ज्या भागातील असतात, त्या भागातील हॅलिपॅडवरून उड्डाण केले जाते. त्या भागात जर हॅलिपॅड नसेल तर संचालक हॅलिपॅडची निवड करून प्रवाशांना ठरलेल्या वेळी येण्याचे सांगितले जाते. या सफारीसाठी प्रवाशांना एका तासासाठी एक लाख ६० हजार ते एक लाख ८० हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे.
हेलिकॉप्टर सफारीसाठी पुण्याहून विविध देवदर्शनाची मागणी
पुण्याहून विविध देवांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक प्रवासी हे तुळजापूर, पंढरपूर व शिर्डीला जाण्यास पसंती देत आहेत. यासह भीमाशंकर, शेगावला जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा कायम आहे. पर्यटनस्थळामध्ये गड किल्ले पाहण्यासाठी प्रवाशांची मागणी अधिक असल्याचे हेलिकॉप्टरचे संचालकांनी म्हटले.