
सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी,कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिक यांच्यावतीने जिल्ह्यात त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आलेले आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आणि सहकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली. या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचे एक नियोजन करण्यात असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आजपर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळाले नव्हते. ते भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेश राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागत त्याच पद्धतीचं झाले पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक २२ रोजीच्या दौऱ्यात संपूर्ण जिल्ह्यातील भेटी अशक्य असल्याने पुन्हा दिनांक २५ डिसेंबरला उर्वरित तालुक्यामध्ये जाऊन ते भारतीय जनता पार्टी व नागरी सत्कार स्वीकारतील. सगळेजण आ. नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी आमची मंडळी आहेत या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे ज्या त्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी सांगितले.