सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर (Onion price) होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे. कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.
सोलापूर बाजार समितीत ४३० गाड्या कांद्याची आवक होती. ४३ हजार ७७ क्विंटल कांद्यापैकी अवघा पाच क्विंटल कांदा चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. उर्वरित ४३ हजार ६८ क्विंटल कांद्याला सरासरी दर अठराशे रुपयांपर्यंतच मिळाल्याचे दिसून आले. बाजार समितीत कांद्याच्या विक्रीतून पावणेआठ कोटींची उलाढाल झाली.
एवढीच आवक असताना मागील दहा दिवसांपूर्वी ११ कोटींपर्यत उलाढाल होती. दरात मोठी घसरण (Onion price) झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात जागेवरच खराब झालेला कांदा काढून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवड केली. त्यातून चार पैसे हाती पडतील, नुकसान भरून निघेल हा त्यामागील हेतू आहे.