नाशिक : नवीन वर्षाला (New Year) सुरुवात होण्यासाठी दोन आठवडे उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक असतात. यावेली अनेकजण ३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस जल्लोषात (31st Party) जागवतात. बहुतांश नागरिक मित्र किंवा परिवारासोबत पार्टीचे बेत आखतात. त्यात मद्यसेवन, मांसाहार मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र या पार्टीनंतर अनेक ठिकाणी अपघात किंवा घातपात होण्याची शक्यता असते. यामुळे आता शहर व ग्रामीण पोलिस सतर्क झाले असून थर्टी फस्ट’च्या पार्टीवर पोलिसांची करडी (Police On Action Mode) नजर असणार आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिस ठाणेनिहाय तसेच स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तसेच साध्या वेशातील पोलिसांमार्फत पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच पोलिस ठाणेनिहाय हॉटेल, बार, रेस्टॉरंट, कॅफेचालकाना सूचना दिल्या असून रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर यावेळी ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीमही शहरात राबवली जाणार आहे. (Thirty First Party)