काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून नव्याने चर्चा सुरू झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा सांगणाऱ्या, सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळ देशाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची जी आज वाताहत झाली आहे, त्याला गांधी कुटुंबातील नव्या पिढीचे नेते राहुल गांधी कसे जबाबदार आहेत, अशी उघड टीका काँग्रेसच्या नेत्यांकडून यापूर्वी झाली होती. २०१९ साली लोकसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याएवढे खासदार निवडून आणण्यात काँग्रेसला यश मिळाले नव्हते. त्यामुळे पक्ष नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी यांच्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला, याचे अनेक किस्से काँग्रेसच्या नेत्यांकडून खासगीत उघडपणे सांगण्यात आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अय्यर यांनी गांधी कुटुंबासंबंधी काही दावे केले आहेत. मणिशंकर अय्यर यांनी मागील १० वर्षांत त्यांना फक्त एक वेळ सोनिया गांधी यांना भेटण्याची संधी मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच गांधी कुटुंबाने माझी राजकीय कारकीर्द घडवली आणि बिघडवली, तरीही मी भाजपामध्ये जाणार नाही, असेही अय्यर यांनी त्यात स्पष्ट केले आहे. राहुल गांधींबरोबर एक प्रसंग वगळता त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याची संधी मिळालेली नाही, तर प्रियंका गांधी यांच्याबरोबर एकदाही भेट झाली नाही. मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी पक्ष कधीही बदलणार नाही, असे मणिशंकर यांनी मुलाखतीत सांगितले. मणिशंकर यांच्या या मुलाखतीमुळे, काँग्रेसचे नेतृत्व करणारे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसे पाहायला गेले तर, काँग्रेसमधील वाचाळवीर नेते अशीच मणिशंकर यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करून, कधी स्वत: तर कधी पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अनेकदा अपमानजनक वक्तव्ये मणिशंकर यांनी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती, असेही वादग्रस्त विधान मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन केले होते. भारतात सुरू असलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या वादानंतरही, पाकिस्तानात जाऊन लाहोरमधील एका कार्यक्रमात जिना यांचे कौतुक केले होते. तसेच अय्यर यांनी जिनांची तुलना महात्मा गांधींशी केली होती. मी अनेक पाकिस्तानी नागरिकांना ओळखतो, जे एम. के. गांधी यांना महात्मा गांधी म्हणतात. मग यामुळे सर्व पाकिस्तानी देशद्रोही ठरतील का? असे वत्कव्य करत मणिशंकर यांनी पक्षाचा रोष ओढून घेतला होता. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
२०१४ नंतरच्या जवळपास प्रत्येक निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचा दारुण पराभव ही हेडलाईन ठरलेली असायची. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वात बदल व्हावा. गांधी कुटुंबीयांच्या व्यतिरिक्त नेत्यांकडे पक्षाची सूत्रे सोपवावी, असा आग्रह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी धरला होता. पक्ष नेतृत्वाने आत्मचिंतन करावे असा जी-२३ नावाने परिषद घेऊन ठराव मांडला होता. माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, माजी मंत्री मनीष तिवारी, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते आनंद शर्मा, माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी, माजी खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा आदींचा या जी-२३ परिषदेमध्ये समावेश होता. ‘नया लडका’ असा राहुल गांधींचा उल्लेख करून गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्यावरही टीका केली होती, तर राहुल गांधी यांना पप्पू नावाची जी उपाधी मिळाली ती काँग्रेस नेत्यांच्या गॉपिंगमधून पुढे आली होती. मात्र, भाजपा नेते हेच राहुल गांधी यांना पप्पू म्हणून हिणवतात, असा आरोप उलटा काँग्रेसवाल्यांकडून करण्यात आला होता. पक्षाच्या नेतृत्वाचा कार्यकर्त्यांशी संपर्क तुटल्यामुळे काँग्रेसने आपला पाया गमावला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलात बैठका घेऊन निवडणुका लढवता येत नाहीत, राहुल गांधींनी काँग्रेसमधील सर्व सल्लागार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे आणि यूपीएचे नुकसान करणारी “रिमोट कंट्रोल” संस्कृती पक्षात आणली गेली आहे, असे मुद्दे उपस्थित करत काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी जी-२३ परिषदेच्या माध्यमातून मंथन केले आणि पक्षाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला; परंतु आत्मचिंतन करण्यापेक्षा ज्यांनी पक्षाचे हित जपण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याचे काम करण्यात आले.
कपिल सिब्बलसारख्या कायदेतज्ज्ञ नेत्याला काँग्रेसने गमावले. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसशी फारकत घेत, स्वतंत्र पक्ष काढण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या १० वर्षांत काँग्रेस पक्षाला कोणताही अजेंडा नसल्यामुळे कधी जातीजनगणनेचा मुद्दा राहुल गांधी लावून धरतात. कधी ते ओबीसींच्या हक्काची भाषा बोलतात. संविधान बचावचे खोटे नरेटीव्ह तयार करून, २०२४ च्या लोकसभेत निवडणुकीत ४४ वरून ९९ पर्यंत खासदार निवडून आणण्यास काँग्रेसला यश मिळाले असले तरी, त्यानंतर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र येथील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुफडा साफ झाला. याचा अर्थ संविधान बचाव हा मुद्दा आता बासनात गुंडाळला गेला आहे. त्यामुळे किमान आता तरी, ज्या नेत्यांनी पक्षांसाठी आयुष्य खर्च केले त्यांना विश्वासात घ्या, अशी मागणी केली तरीही ती प्रथा काँग्रेस पक्षात सुरू होईल का? हाही आज कळीचा मुद्दा आहे.