कॅनबेरा: भारत ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी गाबामध्ये खेळवली जात असून पुन्हा एकदा या कसोटीत भारताची टॉप फलंदाजी फेल ठरली आहे. कर्णधार रोहित शर्माकडून या सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण पुन्हा एकदा भारतीय कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरला आणि स्वस्तात बाद झाला. रोहितच्या विकेटनंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यावरून त्याच्या कसोटी निवृत्तीची चर्चा आता सुरू झाली आहे.
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही रोहित शर्मा फेल गेला आहे.गाबा कसोटीत भारताच्या पहिल्या डावात रोहित शर्माने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली. त्याने २७ चेंडूत एका चौकारासह केवळ १० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. तंबूत परताना त्याची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. जाताना रोहित शर्माने आपले ग्लव्ह्ज काढून टाकत ते त्याने डगआउटमध्ये फेकले.त्यानंतर हातमोजे तिथेच पडून राहिले.त्याचे दोन्ही ग्लव्ह्ज डगआउटमध्ये जाहिरात फलकाच्या मागे पडलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या ग्लव्ह्जचा फोटो व्हायरल होत आहे.त्यामुळे रोहित आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असा अंदाज या फोटोवरून चाहत्यांनी बांधला आहे. ग्लव्ह्ज तिथेच सोडून देण्याचा नेमका अर्थ काय हे सांगणं आतातरी कठीण आहे. मात्र त्याच्या ग्लव्ह्जची चर्चा मात्र रंगली आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. पहिल्या मुलाच्या जन्मामुळे तो पर्थ कसोटीचा भाग होऊ शकला नाही. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने नेतृत्व केलं. हा सामना भारताने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्व केलं आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ३, तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने ६ धावा केल्या. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १० धावा करून बाद झाला. या वर्षी रोहित शर्माने भारताला टी-२० विश्वचषक विजेतेपद मिळवून दिल्यानंतरच त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली घेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केलं आहे.आता रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.