रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जिंदाल पोर्ट कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते. त्यापैकी १९ विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारनंतर दोन प्रोढांनाही त्रास होऊ लागला, त्यांनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.
जिंदाल कंपनीत १२ डिसेंबर रोजी एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या नांदिवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना याचा त्रास झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले तर काहींच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली.अशा १९ विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.७२ तासानंतर प्रोढांनाही त्रास होऊ लागला त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी खासगी रुग्णालयाच्या आवारात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक महिला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. त्यांनी जिल्हा रूग्णालयात आमच्या मुलांवर उपचारच झाले नाहीत फक्त सलाईन लावली त्यामुळे मुलांना होणारा त्रास वाढला असल्याचं सांगितलं. या कंपनीमुळे अशा घटना वारंवार घडणार असतील तर ही कंपनीचं बंद करावी, अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे.या जिंदाल कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर ७२ तासांनी या वायू गळतीचे वाईट परिणाम दिसू लागल्याने आता या भागातील नागरिकांमध्ये भितिचं वातावरण पसरलं आहे.