पालिकेकडून तक्रारी आणि निवेदनाला केराची टोपली.
कर्जत : कर्जत शहरात विविध समस्यांमुळे येथील नागरिक हैराण झाले असून रोज रोज नवनवीन समस्यांमुळे कर्जत शहरातील रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी कर्जत नगरपरिषदेच्या भोंगळ कारभार विरोधात उपोषणाचे हत्यार उपासले आहे.
कर्जत शहरातील टिळक चौकात आज कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आमरण साखळी उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी आपल्या विविध मागण्यांबाबत कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख ॲड कैलास मोरे यांच्यासह ॲड.प्रीती तिवारी,निशा गुप्ता,प्रशांत सदावर्ते आणि राकेश डगले आदी नागरिक उपोषणात सहभागी झाले आहेत.
Jyotiba Dongar : कारवाईला न जुमानता जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी बेकायदा उत्खनन
उपोषण कर्त्याना कर्जत शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.यावेळी महिलांचा मोठं सहभाग होता.
कर्जत नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संपल्यानंतर मुख्याधिकारी वैभव गारवे हे प्रशासक म्हणून काम पाहत आहे. शहराच्या नागरी समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी,निवेदन,चर्चा झाल्या परंतु नागरी समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच गेल्या.कर्जत शहर बचाव समितीने २५ सप्टेंबर २०२४ रोजी नागरी समस्यांबाबत पालिकेला निवेदन देण्यात आले होते.त्यासाठी दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा न झाल्याने ती निष्फळ ठरली.
त्यानंतर पालिका प्रशासनाला नागरी समस्या सोडविण्यासाठी ४ महिन्यांचा अवधी देण्यात आला परंतु अकार्यक्षम अधिकारी आणि निष्क्रिय कर्मचारी यांना नागरी समस्या सोडविण्यात असफल ठरल्याने अखेर कर्जत शहर बचाव समितीने पालिका प्रशासन विरोधात आक्रमक पावित्रा घेत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.सकाळी उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित महिला वर्ग पालिकेच्या मनमानी कारभाराबाबत आक्रमक झालेल्या दिसल्या.यावेळी कर्जत शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गेल्या चार महिन्यांपासून आम्ही कर्जत नागरी समस्यांबाबत पालिकेला निवेदन दिले आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे बनलेले प्रशासनाला नागरिकांच्या समस्याबाबत काही एक पडलेलं नाही.या निष्क्रिय प्रशासनाला जागेवर आणण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपोषण सुरू केले आहे.उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नागरी समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले नाही तर सदर आंदोलन पुढील दिवसात अधिक तीव्र होईल याची नोंद कर्जत पालिका प्रशासनाने घ्यावी.”असे उपोषणकर्ते ॲड कैलास मोरे.(कर्जत शहर बचाव समिती) म्हणाले.
कर्जत शहरातील नागरिकांचे उपोषण कशासाठी ?
१.वेळी-अवेळी तसेच अनियमित , अशुद्ध तसेच कमीजास्त दाबाने पाणी पुरवठा
२.आरोग्यसंदर्भात फवारणी होत नाही.
३.कचरा संकलन होत नाही.
४.एक्स्प्रेस फिडरबाबत निर्णय ?
५.शहरातील रहादारितील पोल हटविणे.
६.सर्व ठेकेदारी पद्धत बंद करणेसाठी. तसेच कर्मचारी झाले ठेकेदार यांची चौकशी.
७.पाणी चोरी थांबविणे.
८. वॉटर लीकेज.
९.नो हाॅकर्स झोन अंमलात आणणे.
१०. मुख्य बाजारपेठेतील बेकायदेशीर हात गाड्यांवर कारवाई, वाहतुक कोंडी सोडविणे.
११.भटक्या कुत्र्यांबाबत ठोस उपाययोजना.
१२. वाढत्या चोऱ्या थांबवण्यासाठी कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील सीसीटीव्ही कार्यान्वित करणे.
१३. शहरात भूमिगत विद्युत पुरवठा.
१४.नदीकिनारी स्वच्छता सुनिश्चित करावी.कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून, नदीकिनारी सूचना फलक लावावेत.
१५.उल्हास नदीतील सांडपाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प(STP) त्वरित सुरू करावा.
१६.बायोगॅस प्रकल्प त्वरीत सुरु करावा.
१७. गुंडगे येथील डम्पिंग ग्राउंड हटविणे.