नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडवाणींची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
अडवाणी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच मेडिकल बुलेटिन जारी केले जाईल. गेल्या ४-५ महिन्यांत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची ही चौथी वेळ आहे आहे. ऑगस्ट महिन्यात अपोलो रुग्णालयात, यापूर्वी २६ जून रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयी समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळेच ते त्यांच्या घरीच राहतात आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला येत नाहीत. अडवाणी यांना यावर्षी देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही प्रदान करण्यात आला होता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.