Saturday, May 17, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Buldhana Hit And Run : बुलढाण्यात हिट अँड रन; तीन तरुण जागीच ठार

Buldhana Hit And Run : बुलढाण्यात हिट अँड रन; तीन तरुण जागीच ठार

अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल


बुलढाणा : येथील अमडापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. मृतांमध्ये प्रतिक भुजे (२५), प्रथमेश भुजे (२६) आणि सौरभ शर्मा (२४) या तीन तरुणांचा समावेश आहे. यातील प्रतिक आणि प्रथमेश हे चुलत भाऊ होते, तर सौरभ त्यांचा मित्र होता.




मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यात अमडापूर येथे शुक्रवारी रात्री हिट अँड रन प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. हे तीन तरुण चित्रपट पाहिल्यानंतर मध्य रात्री दीडच्या सुमारास चिखलीहून उदयनगरकडे आपल्या गावी येत होते. त्याचवेळी अमडापूर गावाजवळ टिपू सुलतान चौकात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली की तिघेही फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. अपघाताचा आवाज आल्याने जवळच असलेल्या टायर पंचरच्या मजुराला जाग आली आणि तो अपघातस्थळी धावत गेला. तेव्हा त्याला तिघेही तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले दिसले. अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अमडापुर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन तरुणांचा असा अंत झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी वाहनचालकाला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment