पार्किंगला जागा द्या, मग टोइंग करा : नागरिकांची मागणी
वसई : वसई – विरार शहर महानगरपालिकेकडे ६८ भूखंड राखीव आहे तरी देखील शहरातील वाहनतळाची समस्या जटिल बनू लागली आहेत. शहरात पालिकेकडे वाहनतळ नसल्यामुळे नागरिकांना शहरात मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करून साहित्याची खरेदीसाठी जावे लागते. उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांडून कारवाई होत असल्याने नागरिकांना दुतर्फा दंड सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी पार्किंगला जागा द्या, मग टोइंग करा अशी मागणी करण्यात आली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ३२ लाखांच्या घरात गेली आहे. यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात गुजरात गॅस कंपनीने आणि जल योजना यांच्या माध्यमातून दुतर्फा खोदून ठेवलेले आहे. त्यामध्ये शहरातील अवैध फेरीवाले, अवैध रिक्षा स्थानके, दुकानदारांनी वाढवेलेले अवैध शेड यांच्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.
त्यात पालिकेने अद्याप नागरिकांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव वर्दळीच्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर आपली वाहने उभी करून सामानाची खरेदी करावी लागत आहे; मात्र उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलिस असा नवा वाद निर्माण झाला आहे.
वसई-विरार शहर पालिकेने शहरातील वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी शहरातील १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. मात्र टेंडर प्रक्रियेसाठी ठेकेदार आले नसल्यामुळे ती प्रक्रिया पुढे राबविता आली नाही अशी माहिती दै. प्रहारला दिली.