राहुरी : दिवसा ढवळ्या बिबट्या येतो नि दारातून अंगणातून जिवंत माणसं चिलेपिले ओढून नेतो, त्याचे अक्षरशः लचके तोडतो वेळ प्रसंगी त्याच्या नरडीचा घोट घेतो. मात्र वनखातं नि सरकार फक्त कागदी घोडे नाचवतं यापेक्षा त्या मानवी जीवाचं दुर्दैव ते म्हणावं लागेल. ग्रामीण ग्रामस्थ या जीवघेण्या संकटातून मोकळा श्वास सोडणार केंव्हा. इतकं मानवी जीवन स्वस्त झालयं का? असे एक ना अनेक प्रश्न आजूबाजूचं ‘बिबट्या दारात अन मरण घरात’ असं चित्र पाहिल्यावर वाटतं
नगर-मनमाड महामार्ग परवडला पणं बिबट्याच्या हातचं मरण नको अशा हताश प्रतिक्रिया ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून आल्या तर नवल वाटण्याचं कारण नको. नुकतीच तालुक्यातील ताहाराबाद येथील घटना मनाला चटका लावून जाते वडील आठवडे बाजार करून घराजवळ येतात म्हणून त्या गाडीकडे धावत जाणारा चिमुकला रूद्र वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याने ओढून चालविला त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ग्रामीण भाषेत झूंजूळ मूंजूळाच्या वेळी म्हणजे सायंकाळी अगदीच सहा वाजताची घटना आपला चिमुकला डोळ्यादेखत बिबट्या नेत असताना पाहून जीवाच्या आकांताने ओरडणारा बिबट्याशी एकाकी झूंज देत चिमुकल्याला त्याच्या तावडीतून सोडवणारा तो बाप अगदी कल्पनेच्या पलीकडलाच. म्हणतात ना आपल्यावर संकट आलं की त्या संकटाची दाहकता कळते परसंकटाचं इतकं सोयरसुतक नसतं वनपरिक्षेत्र अधिकारी पाचारणे आपल्या पथकासह घटनास्थळी येत पंचनाम्याचे सोपस्कार उरकतं पिंजरा लावला जातो.
तो, की दुसराच बिबट्या त्यात अडकतो, वनखात त्याला घेवून जाते इथपर्यंतची वनखात्याची जबाबदारी संपली का? एक बिबट्या पकडला मात्र समुहाने राहणारी ही बिबट्याची जमात, इतर बिबटे तर मोकाट आहेतच ना.या अगोदरची वरवंडीत चिमुकलीला ओढून नेल्याची घटना घडली. देवळाली प्रवरा शिवारात दुचाकीवर झडप घातल्याची घटना कानडगाव येथील महाविद्यालयीन तरूणीने बिबट्याच्या भयानक हल्ल्यातून भावाला वाचविण्यासाठीची धडपड, ग्रामीण भागात दररोज या ना त्या वाडी वस्तीवर कुत्रा, शेळ्या, बोकड यासारखी पाळीव प्राणी ओढून नेण्याचे प्रकार घडत असतात वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पंचनाम्याचे सोपस्कार उरकतं निघून जातात. पिंजरा आहे पण तो ओढून न्या, त्यात भक्ष तुम्हीच बांधा, नि तुम्हीच नजर ठेवा. असे वनखाते सांगत असते. गोरगरीब जनता एवढा खर्च करणार कुठून त्यापेक्षा रात्र – रात्र जागून घरादाराचे राखण बरोबरच शेतात पाणी भरण्यासाठी दोन तीन मजूर लावून पाणी भरण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याचे दिसते गत वर्षभरात बिबट्यांची संख्या दुपटीने वाढली असल्याचे ग्रामस्थ सांगतात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेली बिबट्यांची संख्या मानवी जीवाविषयी चिंताजनक असल्याचे वास्तव आज पर्यावरण प्रेमीही करू लागले आहेत. या बिबट्यांच्या संकटाने गावच्या गाव हादरली आहेत. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी मोठे आवाज करण्यात येत होते. परंतु ते आवाज करण्यावरही मर्यादा येत आहेत रात्रभर फटाके फोडण्यासाठी पैसा आणणार कुठून, यासाठी शस्रधारी जवान नेमायचे का? असाही सुर सरकारविरोधात ऐकावयास मिळत आहे. दिवसागणिक शेतकरी व मजूर वर्गाच्या कळपातील एखाद दुसरे पाळीव जनावर बिबट्याकडून फस्त केले जात आहे.
नगण्य भरपाईने त्याचे नुकसान भरून निघणार नाही. तर मानवी जीवावरील हल्ले कोणत्याही नुकसान भरपाईने भरून निघणार नाही. बरोबरच मानसिक खच्चीकरण वेगळेच, या बिबट्यांच्या दहशतीने ग्रामीण व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. पाणी आहे पण पिकाला देता येत नाही. कारण दिवसाढवळ्या बिबट्या कुठून येईल नि काय होईल याची शाश्वतीच राहीली नाही त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे, अंगणात असलेलं संकट दारात नि दारातलं घरात कधी येईल याचा नेम राहीला नाही. त्यामुळे या संकटाने ग्रामीण अर्थचक्र जे कोलमडलं होत त्यात आता नव्याने भर पडली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतूद वनखात्यासाठी करण्यात आल्याचे दिसते त्यात वन्यजीवांच्या संरक्षणावर भर देण्यात येतो तर या वन्यजीवांपासून होत असलेल्या मानवी जीवांच्या संरक्षणाचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.