पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पुण्याच्या वर्तुळाकार मार्गासाठी (रिंग रोड) पूर्व आणि पश्चिम भागातील २०० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन बाकी असून, त्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. दरम्यान, येत्या रविवारपर्यंत (१५ डिसेंबर) जमीनमालकांनी संमतीने जागा दिल्यास त्यांना २५ टक्के मोबदला दिला जाणार असून, त्यानंतर सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे.
पुणे रिंग रोडच्या प्रलंबित भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यावेळी भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे तसेच विविध ठिकाणचे भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. रिंग रोडसाठी सुमारे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. रिंग रोडसाठी १ हजार ७४० हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी पूर्व भागात ४७ गावांमधून ८५८.९६ हेक्टर, तर पश्चिम भागातील ३६ गावांतील ६४४.११ हेक्टर क्षेत्र संपादन करण्याचे उद्दिष्ट होते. सुमारे १ हजार ३०० हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. पूर्व भागातील १४३ आणि पश्चिम भागातील ६३ हेक्टर म्हणजेच एकूण २०६ हेक्टर क्षेत्राचे संपादन अद्यापही बाकी आहे. भूसंपादन झालेल्या क्षेत्राचे निवाडे करण्याची प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्याची माहिती भूसंपादन समन्वयक कल्याण पांढरे यांनी दिली.
पूर्व भागातील पुरंदर, भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील तसेच पश्चिम भागातील खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील काही क्षेत्राचे संपादन करणे बाकी आहे. त्यासंदर्भात येत्या १५ डिसेंबरपर्यंत होणारे भूसंपादन संमतीने झाल्यास २५ टक्के मोबदला दिला जाणार आहे. त्यानंतर होणारे भूसंपादन हे सक्तीने करण्यात येणार आहे. त्यामुळे सक्तीच्या भूसंपादनात चारपटीने मोबादला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात तालुका भूसंपादन अधिकाऱ्यांना तशी स्पष्ट सूचना बैठकीत करण्यात आली.