मुंबई : मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दादरचे प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर बुधवारपासून पुढील पाच दिवसांसाठी बंद राहणार आहे. या मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक श्रद्धेने लांबून दर्शनासाठी येत असतात. परंतु येत्या १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या पाच दिवसांसाठी सिद्धिविनायक मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना १९ डिसेंबरला दुपारपासून घेता येणार आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.