मुंबई : राज्यात पुढील काही दिवस थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईत सोमवारी गेल्या ९ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तर जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली जळगावमध्ये ८.९ डिग्री अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान नोंदवले गेले. तर पुण्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे देखील कमी तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस राज्याच्या तापमानात आणखी ४ ते ५ अंश डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Nagpur Winter Session 2024 : ठरलं तर! या ‘दिवशी’ होणार हिवाळी अधिवेशन सुरु
राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबईकरांसाठी सोमवार गारेगार व थंडीचा ठरला. मुंबईकरांनी गुलाबी थंडीचा आनंद सोमवारी घेतला. सोमवारी मुंबईत पहाटे गेल्या ९ वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ केंद्रात सोमवारी १३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ९ वर्षातील हे सर्वात कमी तापमान होते. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये किमान तापमान ११.४ अंश सेल्सियस होते. मुंबईत किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. या बाबत भारतीय हवामान विभागाचे पुण्याचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येत्या २४ तासांत मुंबई, नाशिक, जळगाव व पुण्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज आग्नेय बंगालच्या उपसागर आणि लगतच्या पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरावरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेला सुरू असून पुढील २४ तासात ते अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान पुढील चार ते पाच दिवस दहा ते आठ डिग्री राहण्याची शक्यता आहे.