मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या संदर्भातील तारीख जाहीर करण्यात आली असून, १६ डिसेंबर रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
या अधिवेशनादरम्यान आमदारांचा शपथविधी, राज्यपालांचे अभिभाषण आदी पार पडेल. सध्या मुंबई राज्याचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. हे सत्र आठवडाभर असेल. तसेच १२ डिसेंबरपासून सचिवालय आणि १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होणार आहेत.
दरम्यान, नागपूरात होणाऱ्या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर नवीन नावाच्या पाट्या लावण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर नवीन नावाची प्लेट लावण्यात आली आहे. ज्यामधाये एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे असे लिहिले आहे. त्यांना देवगिरी बंगला देण्यात आलेला आहे.
विदर्भाचे अनेक प्रश्न या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार का? प्रत्येकजण उत्सुक आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वतः विदर्भातील असल्याने लोकप्रतिनिधींसह विदर्भातील जनतेकडूनही विशेष अपेक्षा असल्याचे बोलले जाते. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे.
Solapur News : मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांची नाराजी
दरम्यान, आज महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, भाजपचे आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.