Friday, October 31, 2025
Happy Diwali

Indonesia : इंडोनेशियात पूर, दरडी कोसळल्यामुळे १० जणांचा दुर्दैवी मृत्यू

Indonesia : इंडोनेशियात पूर, दरडी कोसळल्यामुळे १० जणांचा दुर्दैवी मृत्यू

जकार्ता : इंडोनेशियातल्या जावा बेटावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. इंडोनेशियातील जावा बेटावरील डोंगराळ गावे अचानक पूर आणि भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.बचाव कर्मचारी अजून बेपत्ता असलेल्या आणखी दोन गावकऱ्यांचा शोध घेत आहेत.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंडोनेशियातल्या नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने पश्‍चिम जावा प्रांतातील सुकाबूमी जिल्ह्यातील तब्बल १७० गावांना वेढले आहे. यामुळे १७२ गावे उद्ध्वस्त झाली आहेत. डोंगरांवरून आलेल्या पाण्याबरोबर चिखल, दगड, माती आणि झाडे पायथ्याजवळच्या गावांवर येऊन पडले आहेत. अनेक ठिकाणी डोंगरांचा भाग देखील तुटून मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे तब्बल ३ हजार लोकांना सरकारी आश्रय छावण्यांमध्ये तात्पुरता आश्रय घ्यावा लागला आहे. आणखी पावसाची शक्यता असल्यामुळे ४०० घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे १ हजार नागरिकांना प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे.

पूरामुळे ३१ पूल, ८१ रस्ते आणि ५३९ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. तर १,१७० घरे पूराच्या पाण्याखाली पूर्ण बुडाली आहेत. याशिवाय ३,३०० अन्य घरे अथवा इमारतींचेही नुकसान झाले आहे, असे स्थानिक आपत्ती निवारण एजन्सीने म्हटले आहे. गेल्या महिन्यात सुमात्रा बेटावर झालेल्या अतिवृष्टीमुळे २० जणांचा मृत्यू झाला होता. दोघेजण अजून बेपत्ता आहेत. तर दरड कोसळल्यामुळे एका बसमधील ९ प्रवासी ठार झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >