सोलापूर : पावसातून वाचलेल्या मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्यांची नाराजी आणखी वाढली आहे. मक्याचे दर वाढण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकर्यांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मक्याला गेल्या दोन महिन्यांपासून चांगला भाव मिळत नाही. मात्र, लागवड खर्चात वाढ होत आहे. तरीही दरात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. मक्याच्या व्यापार्याकडून शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.
प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांपर्यंत मिळणारा दर आता घसरून २१०० रुपयांवर आला आहे.
मक्यामध्ये ओलावा असल्याचे कारण देत व्यापारी दर देत नाहीत. अतिवृष्टीतून वाचविलेले मका बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत आहेत. मका उत्पादनासाठी काढणी व मळणी वगळता एकरी २० हजारांचा खर्च करावा लागतो. पाच वर्षांपूर्वी (२०२०-२१) नांगरणीचा खर्च १२०० रुपये, बियाणे प्रतिबॅग ८०० ते १५००, युरिया २४०, डीएपीसह मिश्रखते १०५० ते ११३० रुपयांना मिळत होती. दोन वेळच्या तणनाशकाचा खर्च १६००, तर तीनवेळा कीटकनाशक फवारणीचा खर्च ३००० रुपयांपर्यंत होता. काढणीसाठी अडीच हजारांपर्यंत, तर मळणीसाठी प्रतिपोती ७० रुपयांचा दर होता. त्यात आत दुपटीने वाढ झाली आहे. तुलनेत हमीभावात वाढ झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून मक्याला चांगला दर मिळत नाही. तोच नवीन आवक झाली आहे. या मक्याला २ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.
मक्याच्या दरात वाढ होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सध्या मिळणार्या दरातून उत्पादन खर्चही शेतकर्यांच्या पदरात पडत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या दरात मंदी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत जाणवत आहे. सांगोला तालुक्यात शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.