मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेटनी पराभव सहन करावा लागला. पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचे शेर मात्र अॅडलेडमध्ये ढेर झाले. हा कसोटी सामना पिंक बॉलने(pink ball) खेळवण्यात आले. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला होता. पर्थमध्ये गोलंदाजांसह फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले होते. यशस्वी जायसवाल आणि विराट कोहलीने शतके ठोकली होती. तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट मिळवल्या होत्या. अशातच पर्थमध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे हिरो अॅडलेडच्या मैदानावर मात्र हतबल दिसले.
संपूर्ण सामन्यात टीम इंडियाला दोन्ही डावांत मिळून केवळ ८१ षटकांचा खेळ करता आला. टीम इंडियाने पहिल्या डावात १८० आणि दुसऱ्या डावात १७५ धावा केल्या. पहिल्या डावात ३०० धावा जरी बनल्या असत्या तरी टीम इंडियाला फायदा झाला असता. हा दुसरा कसोटी सामना डे-नाईट होता.
या गुलाबी बॉलच्या कसोटीत भारत पुन्हा एकदा अयशस्वी पाहायला मिळाला. याआधीच्या कसोटीतही भारताला पराभव सहन करावा लागला होता.