यवतमाळ : प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या वेळी करण्यात येतो. या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा धाग्यांच्या वापरास तसेच इतर वेळी नायलॉन मांज्याची धाग्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कायमस्वरुपी बंदी घातली आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध याद्वारे करण्यात येत आहे.
https://prahaar.in/2024/12/06/first-salman-khan-then-baba-siddiqui-accused-in-baba-siddiqui-shooting-case-makes-sensational-revelation/
पतंग उडविताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हाणी होणे याबाबतची जनजागृती जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागाने करावी, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ मध्ये नमूद शास्तीस पात्र होतील. जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागाने पथके गठीत करुन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी त्यांच्या कार्यक्षेत्रात करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.