सद्गुरू वामनराव पै
कुठलीही गोष्ट चांगली की वाईट हे तुझ्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाचा तू वापर कसा करतो यावर अवलंबून आहे. आपण काळा पैसा म्हणतो पण पैसा काळा किंवा गोरा नसतो, तर पैसा वापरणारे त्यांच्या वर्तणुकीमुळे काळे किंवा गोरे असतात. काळे धंदे करणारे, काळा व्यवसाय करणारे लोक जे असतात त्यांचा पैसा हा काळा पैसा असतो. भ्रष्टाचाराबद्दल आता केवढे मोठे रण चाललेले आहे. भ्रष्टाचारामुळे हिंदुस्थान अगदी गुदमरलेला आहे, मरणोन्मुख झालेला आहे. जितक्या लवकरात लवकर यातून हिंदुस्थानची सुटका होईल तितके आपण सुखी होऊ, आपली प्रगती होईल. प्रत्यक्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या ठिकाणी ज्ञानच आहे आणि त्याला विरोध करणाऱ्यांच्या ठिकाणीही ज्ञानच आहे. सर्व ठिकाणी ज्ञानच कार्य करत असते. चांगले किंवा वाईट, देतो तो देव. हा देव सुखही देतो, दुःखही देतो. आपण काय म्हणतो, शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा. शरीराने परमेश्वर व्हायचे की सैतान व्हायचे हे तुझ्या हातात आहे.
आज शरीर सैतान झालेले आहे कारण पैसा हाच देव झालेला आहे. पैशासाठी वाट्टेल ते करायचे अशी आज परिस्थिती आहे म्हणजे माणूस सैतान झालेला आहे. परमेश्वर पाहिजे की सैतान पाहिजे हे तू ठरव. परमेश्वर होणे किंवा सैतान होणे हे ज्ञानच आहे. ज्ञान हे अज्ञान आहे की विज्ञान आहे हे महत्त्वाचे आहे. ज्ञान हाची विठ्ठल असे म्हणतो तेव्हा ज्ञान म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे. ज्ञान हे आपल्या ठिकाणी मुळांत आहे. आपले स्वरूपच ज्ञान आहे. सत्, चित्, आनंद यांत सत् आणि आनंद यांच्यामध्ये चित् आहे. चित् म्हणजे जाणीव, चित् म्हणजे दिव्य ज्ञान, चित् म्हणजे दैवी अंतर्ज्ञान. चित् म्हणजे दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान एवढे लक्षात ठेवले, तर ते आपले स्वरूपच आहे हे ध्यानात येईल. आज काय झालेले आहे? आज ते गढूळ झालेले आहे. किती गढूळ झालेले आहे हे उदाहरण देऊन सांगतो. गंगा नदी किती गढूळ झालेली आहे? आज जर तुम्ही हरिद्वारला गेलात, तर गंगेचे पाणी पिऊ नका. पंढरपूरची भीमा नदी, चंद्रभागा या किती गढूळ झालेल्या आहेत की तिथे लोक स्नान कसे करतात हे त्या देवालाच ठाऊक.
सांगायचा मुद्दा, गंगा नदी गढूळ झाली, चंद्रभागा गढूळ झाली, भीमा नदी गढूळ झाली किंबहुना हिंदुस्थानातल्या सर्वच नद्या गढूळ झालेल्या आहेत. त्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत. कारखान्यांची रासायनिक द्रव्ये त्यात सोडली जातात, घाणेरडी कृत्ये केली जातात, नदीत प्रेते सोडली जातात या सर्व कारणांमुळे नदीचे पाणी गढूळ झालेले आहे. पूर्वी गंगा नदीत स्नान केल्याने आपण पवित्र होतो असे आपण म्हणत होतो, तिचे पाणी आज तोंडात घालण्याची सोय राहिलेली नाही, कारण आज ते गढूळ झालेले आहे. तसे आपल्या ठिकाणी जी दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान होते ते आज गढूळ झालेले आहे. त्यामुळे ते ज्ञान आज देव राहिलेले नाही, तर ते ज्ञान आज दैत्य झालेले आहे. जीवनविद्येने या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. ज्ञान, विज्ञान व अज्ञान यांत ज्ञान महत्त्वाचे आहे. शुद्ध ज्ञान मिळणे, सुंदर ज्ञान मिळणे, आपले व लोकांचे भले करणारे ज्ञान मिळणे व त्या ज्ञानाचा सदुपयोग करणे हे महत्त्वाचे आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जग सुखी होणार नाही. हे जग सुखी व्हायला पाहिजे असेल, तर शुद्ध ज्ञानाची उपासना केली पाहिजे. आता हे करायचे की न करायचे हे तुझ्या हातात आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.