रामदास आठवले यांची मागणी
मुंबई : अखेर महायुतीने (Mahayuti) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, भाजपा विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे ठरले आहे. यातच आता रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात स्थान हवे असल्याची मागणी केली आहे.
या घडामोडींवर मीडियाशी बोलताना रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले आहे की, या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवे. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे, असे रामदास आठवले यांनी सागितले.