अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पाठोपाठ फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उद्या होणारा शपथविधी व सत्तास्थापनेबाबतची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिल्या, तसेच एकनाथ शिंदे व अजित पवारांनी एकमेकांना चिमटे काढत फिरकी घेतली.
Ravi Tandon : रविना टंडनची मुलगी करतेय ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला डेट
यावेळी पत्रकारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं की उद्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “थोडी कळ काढा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळी माहिती मिळेल”. तर, क्षणाचाही विलंब न करता अजित पवार म्हणाले, “त्यांचं संध्याकाळी समजेल, पण मी तर उद्या शपथ घेणार आहे. मी थांबणार नाही”. अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदे यांनी देखिल मिश्किल टिप्पणी करत ते म्हणाले, “अजितदादांना अनुभव आहे. त्यांना संध्याकाळी शपथ घेण्याचा, त्याचबरोबर सकाळी शपथ घेण्याचा देखील अनुभव आहे”. शिंदेंच्या या टिप्पणीवर अजित पवार कुरघोडी करत म्हणाले, “मागच्या वेळी आम्ही दोघांनी (मी व देवेंद्र फडणवीस) सकाळी शपथ घेतली होती. परंतु, त्यावेळी सरकार चालवायचं राहिलं होतं. यावेळी पुढच्या पाच वर्षांसाठी सरकार चालवणार आहोत”.
दरम्यान, “मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रीमंडळात राहावे. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते, मित्रपक्ष असे मिळून चांगले सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करू”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.