पुणे : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झालेले पुण्यातील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (SP Group) दोन माजी आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीत योग्य पुनर्वसन झाल्यास हे माजी आमदार पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचे समजते. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होण्याची भीती असल्याने या माजी आमदारांबाबत अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Kashmir Shawl : काश्मिरी, पश्मिना, राजस्थानी शालींना पसंती; खरेदीसाठी महिलांची गर्दी!
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या तीनही विद्यमान आमदारांचा पराभव झाला, तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे. याउलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले आहेत. त्यातच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता असल्याने आगामी काळात पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील पराभूत आमदारांनी आगामी राजकारणाची दिशा पाहून अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांतील प्रत्येकी एका माजी आमदाराचा समावेश आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादीत येण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, आपले पक्षात योग्य पुनर्वसन व्हावे, अशी या माजी आमदारांची मागणी आहे. त्यासाठी पवारांशी संपर्कही साधला असल्याचे सांगण्यात येत आहे.