शिबानी जोशी
एकदा उच्चशिक्षण घ्यायला माणूस यूएसएला गेला की तो तिथलाच होऊन जातो. एखादे दुसरे अतिशय दुर्मीळ उदाहरण आपण पाहतो की जो मुलगा अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन तिथे ८, १० वर्षे नोकरी करून मायदेशी परतला आहे आणि इथेही यशस्वी झाला आहे. केवळ व्यक्तिगत यश नाही, तर देशाच्या विकासामध्ये त्यांनी हातभार लावला आहे. असे उद्योजक म्हणजे टेक्नोकेमचे श्रीराम कुलकर्णी. लहानपणापासूनच ते हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणले जायचे. दहावी-बारावीपर्यंत रूपरेल त्यानंतर आयआयटी कानपूरमध्ये केमिस्ट्री विषय घेऊन डिग्री घेतल्यानंतर ज्याप्रमाणे त्या काळात मुले अमेरिकेला जाऊन एमएस करत असत, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून श्रीराम कुलकर्णी हे सुद्धा अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्यासाठी गेले. खरं तर दोन-तीन वर्षांचा अनुभव घेऊन पुन्हा भारतात परतण्याचे त्यानी ठरवले होते, कारण त्यांच्या वडिलांचा छोटा उद्योग इथे होता; परंतु अमेरिकेतील चांगली नोकरी, तिथले वातावरण याने त्यांना बारा ते चौदा वर्षे रोखून धरले. भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था यांची प्रथमपासूनच प्राथमिकता असल्यामुळे लग्न होऊन मुले झाल्यानंतर त्यांनी विचारपूर्वक पुन्हा भारतात येण्याचे ठरवले आणि येऊन वडिलांच्या उद्योगांमध्ये काम करायला सुरुवात केली. भारतात येण्यामागे तीन कारणं होती. एकतर मुलांना भारतीय संस्कार संस्कृतीमध्ये मोठे करणे, दुसरे घरातलाच व्यवसाय होता तो वाढवणे आणि तिसरे म्हणजे त्याच दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वेग घेत होती, १९९० च्या आर्थिक सुधारणांमुळे खूप संधी होत्या तसेच औद्योगिकीकरण होत असल्यामुळे पाण्याचीही गरज वाढत होती. केवळ अशुद्ध पाणीच नाही तर कारखान्यातून उष्णताही खूप निर्माण होते. या वाया जाणाऱ्या उष्णतेपासून बीज निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे. वॉटर डिसलायझेशन म्हणजेच खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी करणे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून वाळवंटी आणि खार पाणी क्षेत्रात वॉटर डिसलायझेशनचा प्लांट हा एक अनोख्या उद्योगाचा त्यांनी झेंडा रोवला आहे. श्रीराम कुलकर्णी यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्याख्याने दिली आहेत तसेच त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे. चैतन्य महाराज देगलुरकर आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार श्रीराम कुलकर्णी यांना देण्यात आलाय.
श्रीराम कुलकर्णी यांनी सुरुवात केली ती इस्रायलबरोबरच्या व्यवसायातून. १९७२ पासून त्यांच्या वडिलांचे इस्रायलमधील शांशी औद्योगिक संबंध होते आणि इस्रायलच्या पाणी क्षेत्रातील कंपनीला भारतात यायचे होते. त्यामुळे त्यांची मोठी मोठी उपकरणे भारतात पुरवणे आणि त्याची आफ्टर सेल सर्विस करणे हे काम त्यांनी सुरू केले. देशभरातल्या वेगवेगळ्या महानगरपालिका, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजसाठी पाणी व्यवस्थापन आणि शुद्धीकरण, पाण्याचा पुनर्वापर या कामांना सुरुवात केली. टेक्नोकेम आज भारतातील रसायने, पाणी, ऊर्जा, अक्षय ऊर्जा, ऑटोमेशन आणि बांधकाम संबंधित प्रकल्पांसाठी खास इस्रायलमधील विविध उपकरणांचे प्रतिनिधित्व करत आहे. गेल्या पाच दशकांपासून आशिया, इस्रायल, युरोप, यूएसए, कॅनडा, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही सेवा देत आहे.
औद्योगिक शुद्ध पाणी, सांडपाणी प्रक्रिया आणि सांडपाणी पुनर्वापर, तंत्रज्ञान यावरही खासगी कंपन्या, महानगरपालिका यांच्यासाठी खूप ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत. आपल्या देशात काही ठिकाणी पूर येतो, तर काही ठिकाणी वाळवंट आहे. आपल्या देशातील पाण्याचे व्यवस्थापन हे अतिशय अनऑर्गनाइज्ड आहे असे कुलकर्णी यांचे मत आहे. औद्योगिक, घरगुती प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते आणि चांगले पाणी खराब होते, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही त्यामुळे आजही पिण्याच्या पाण्यासाठी गावातल्या लोकांना वणवण करावी लागते, पाण्याचे व्यवस्थापन केले तर हे थांबवता येऊ शकते. १९९०च्या आर्थिक सबलीकरणानंतर महाराष्ट्र, गुजरातमध्ये खूप मोठ्या इंडस्ट्री झाल्या. जामनगरमध्ये रिलायन्सने खूप मोठा प्रोजेक्ट सुरू केला आणि त्यांना मुख्यत्वे पाण्याची गरज होती. समुद्र जवळ असल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे औद्योगिक व्यापराच्या पाण्यात रूपांतर करण्याचा मोठा प्रोजेक्ट त्यांनी उभारला आहे. हा आशियामधला सर्वात मोठा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. आज संपूर्ण रिलायन्स कारखान्याला पाणी पुरवून उरलेले पाणी रिलायन्स जामनगर महापालिकेला सुद्धा सीएसआर म्हणून देते. त्यानंतर त्यांनी चेन्नई महापालिकेसाठी, बंगलोर, हैदराबाद इथे सुद्धा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी असा प्रकल्प उभारून दिलाय.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि इस्रायल १९४८ साली स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इस्रायल हा पाणीटंचाई असलेला देश होता, तर भारत हा अतिरिक्त पाणी असलेला देश होता. योग्य नियोजन केल्यामुळे आज इस्रायल पाणी स्वयंपूर्ण देश झालाय, तर भारत हा पाणीटंचाईग्रस्त देश झाला आहे. त्यामुळे पुनर्वापर, संरक्षण आपल्या देशाला अत्यंत गरजेचे असल्याचे श्रीराम कुलकर्णी सांगतात. गेल्या दहा वर्षांत मात्र मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले असून अनेक ठिकाणी मोठमोठे प्रकल्प उभे करत आहेत. त्यासाठी जनशक्ती मंत्रालय स्थापन केले असून त्यांचे बजेट एक लाख कोटी रुपये इतके आहे. आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे जवळजवळ ७० टक्के पाणी हे कृषी क्षेत्रात, २० टक्के पाणी पिण्यासाठी व १० टक्के उद्योग कारखान्यासाठी वापरले जाते. सरकार कृषी आणि पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देते. उरलेले पाणी उद्योगांना मिळते. त्यामुळे उद्योगांना पाण्याची स्वतःची व्यवस्था निर्माण करावी लागते आणि त्याचे तंत्रज्ञानच कुलकर्णी यांचे टेक्नोकेम कंपनी पुरवत असते. भारतामध्ये पाणी व्यवस्थापनाच जवळजवळ ५०० बीलियन यूएस डॉलर्स इतके मोठे मार्केट आहे.
त्यामुळे या क्षेत्रात तरुण उद्योजकांना तंत्रज्ञान, डिझाईन, जलसंरक्षण, जलसंवर्धन, पुनर्वापर या क्षेत्रात खूप मोठा वाव आहे, असे कुलकर्णी सांगतात. कुलकर्णी यांचा भारत देशाच्या आणि व्यवस्थापनाचा खूप मोठा अभ्यास आहे. त्याचा वापर सरकारने करून घेतला पाहिजे असे मला वाटते. उद्योग भरभराटीला आला की त्याबरोबर नाव, पैसा, प्रतिष्ठा सर्वच मिळत जाते; परंतु धंद्यामध्ये माणूस केवळ पैशांनी श्रीमंत होतो; परंतु मानसिक श्रीमंती, सामाजिक दायित्व याची जाणीव एखाद्या उद्योजकाने ठेवली तर तो उद्योजक व्यावसायिक यशबरोबर सामाजिक बांधिलकी जपू शकतो. श्रीराम कुलकर्णी सुद्धा अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत. मुलुंड इथल्या विद्या प्रसारक मंडळ ही संस्था खरं तर त्यांच्या वडिलांनीच स्थापन केली. १९५७ साली त्यांनी पहिल्यांदा आपल्या घरात शाळा भरवली होती. त्या शाळेचा आज वटवृक्ष झालाय आणि त्या वटवृक्षाचे हर प्रकारे सिंचन करण्याचे काम श्रीराम कुलकर्णी करत असतात. या संस्थेच्या बाल वर्ग ते पदवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा आहेत. ५००० मुले आज या शाळांमध्ये शिकत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाल्यानंतरही मूलभूत गरज असलेले पाणी सर्वांना अजूनही मिळत नाही, याचे कारण नियोजनाचा अभाव आहे. हेच नियोजन करण्याचे काम कुलकर्णी करतात. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरून देशातल्या प्रत्येक भागात पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी जागरूक होण्याची गरज त्यांच्याशी बोलताना वारंवार जाणवत होती.
joshishibani@yahoo. com