 
                            वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)सोमवारी हमासविरुद्ध कडक विधान केले आहे. त्यांनी गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेबाबत हमासला धमकीवजा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले जर २० जानेवारी २०२५ पर्यंत ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली नाही तर ते मध्य पूर्व येथे सारं काही उद्ध्वस्त करतील.
ट्रम्प यांनी आपल्या विधानात म्हटले, जर ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली नाही तर अमेरिकेच्या मानवतेविरोधात हा गुन्हा करणाऱ्यांना इतिहास मोठी शिक्षा देईल.. त्यांनी हा मुद्दा अमेरिकेची प्रतिष्ठा आणि न्यायासाठी गंभीर असल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायलच्या आकड्यांनुसार ७ ऑक्टोबर २०२३ ला इस्त्रायलवर हमासच्या हल्ल्यादरम्यान २५०हून अधिक जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. यात साधारण १०१ विदेशी आणि इस्त्रायलचे नागरिक आजही हमासच्या ताब्यात आहेत. हमासचा दावा आहे की यातील ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे हमासची मागणी
हमासविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर इस्त्रायलने हमासला संपवण्यासाठी सातत्याने हल्ले केले आहेत. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टीचे रूपांतर खंडरमध्ये झाले. यानंतरही हमास काही मागे हटायला तयार नाही.इस्त्रायलच्या सैन्याने गाझा पट्टीतून माघार घ्यावी अशी हमासची मागणी आहे. तसेच ते ओलीस ठेवलेल्यांच्या बदल्यात फिलीस्तानी कैद्यांच्या सुटकेची मागणी करत आहे. हमासच्या मागणीवर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, जोपर्यंत हमास पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत युद्ध सुरू राहील.

 
     
    




