उज्जैनमधील महाकाल मंदिरात नवीन सुविधा
मध्यप्रदेश : आतापर्यंत एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येत होते. परंतु आता अशाच एका एटीएम सारख्या मशीनमधून प्रसाद मिळणार आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर (Ujjain Mahakal Temple) मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विशिष्ट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. महाकालेश्वर मंदिरात भाविकांसाठी लाडू वेंडिंग एटीएम मशीन (ATM Laddu Machine) बसवण्यात आले आहे. हे मशीन एटीएमप्रमाणेच काम करणार आहे. भक्तांना क्यूआर कोड स्कॅन करून भगवान महाकालचा लाडू प्रसाद घेता येणार आहे.
Vikrant Massey : ३७व्या वर्षी विक्रांत मॅसीचा अभिनयातून संन्यास; केली शॉकिंग पोस्ट
जे.पी.नड्डा यांच्या हस्ते मशीनचे लोकार्पण
मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव आणि केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा (JP Nadda) यांनी काल महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महाकालाचे दर्शन व पूजा केली. यानंतर नंदीमंडपमध्ये चिंतन व पूजा केली आणि मंदिरात बसवलेल्या वैदिक घड्याळाचेही निरीक्षण केले. त्यानंतर महाकालेश्वर मंदिरात बसविण्यात आलेल्या लाडू एटीएम मशीनचे विधीवत उद्घाटन करण्यात आले.
पेमेंट होताच लाडू दिले जातील
महाकाल मंदिर समितीचे प्रशासक गणेश धाकड यांनी सांगितले की, “”हे मशिन दिल्लीतील एका देणगीदाराने बसवले आहे. सुरुवातीला सर्व ८ प्रसाद काउंटरवर ही मशिन्स बसवली जातील. भाविकांनी क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर वेंडिंग एटीएम मशीनच्या प्रसाद विहिरीतून लाडूचे पाकीट बाहेर येईल.
मंदिर बंद झाल्यानंतरही मिळणार प्रसाद
लाडू प्रसादाची वाढती मागणी पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेषत: महाशिवरात्री, नागपंचमी आणि श्रावण महिन्याच्या सणांना मंदिरात लाडू प्रसादाची मागणी खूप वाढते. या दिवसांमध्ये मंदिरात ५० क्विंटलहून अधिक लाडू प्रसाद तयार केला जातो. सामान्य दिवशीही मंदिरात दररोज ३० ते ४० क्विंटल लाडू प्रसादाचे वाटप केले जाते. या मशीन्स बसवल्याने भाविकांना जलदगतीने लाडू मिळू शकणार असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मंदिर बंद झाल्यानंतरही भाविकांना प्रसाद घेता येणार आहे.