Friday, January 17, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखकथा एका आत्मक्लेषाची!

कथा एका आत्मक्लेषाची!

काही राजकीय दिवाळखोर झाले आहेत आणि काही वैचारिक. त्यात भर आता मातोश्री गँगची पडली आहे. त्यामुळे असे सगळे दिवाळखोर एकत्र येवून सर्वसामान्य जनमताचा एक प्रकारे अपमान करण्यास सिद्ध झाले आहेत. या प्रक्रियेत बाबा आढाव एक प्यादे आहे. काही वर्षांच्या पूर्वी आण्णा हजारे यांना वापरून केजरीवाल नामक शहरी नक्षलवादी भारताच्या राजकीय क्षीतिजावर उदयाला आला. आता असे प्यादे वापरून पुन्हा राजकीय पुनर्वसन करून घेण्याचे डाव कोणी आखत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की समाज आता जागृत झाला आहे.

रवींद्र मुळे

पुण्यात एक आत्मक्लेषाचे नाटक सुरू होते ते अखेर संपले. मुळात आत्मा ज्यांना असतो त्यांना क्लेष झाला पाहिजे. आत्मा ही खरे तर हिंदू संकल्पना! आयुष्य ज्यांचे हिंदू धर्माला शिव्या देण्यात गेले, जे अखंड समाजवादी चळवळीत वावरले त्यांना ह्या वयात माणसात आत्मा असतो ह्याचा शोध लागला हेही नसे थोडके! आत्मा शोधला आता त्याला क्लेष का द्यावा वाटला? तर म्हणे निवडणुकीत झालेले गैर प्रकार आणि सत्तेचा दुरुपयोग! खरा क्लेष उपोषण करणाऱ्याला आणि त्याच्या तमाम संवगड्यांना खूप पूर्वीच झालेला आहे. हे संवगडी म्हणजे तमाम समाजवादी मंडळी. जी काही समाजवादी चळवळ ह्या देशात सुरू झाली त्याचे आज जे दुर्दैवी अवशेष राजकीय स्वरूपात अस्तित्वात आहेत त्यात उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव नावाने, महाराष्ट्रात अबू आझमी नावाने आणि बिहारमध्ये लालूप्रसाद नावाने. समाजवादाच्या नावाने ह्या मंडळीनी मुस्लीम लांगून चालन करण्याचा, भ्रष्टाचाराचा आणि जातीयवादाचा, घराणेशाहीचा जो नंगानाच घातला आहे त्यामुळे बाबा आढाव यांना आत्मक्लेष कधी झाला नाही किंवा करून घ्यावा वाटला नाही.

ज्या विचाराला राजकीय विरोध केला, द्वेष केला, संपवण्याची भाषा केली तो विचार दिवसागणीक वाढत गेला, संघटन वाढत गेले. राजकीय क्षेत्रात हा विचार यशस्वी झाला असा संघविचार, राष्ट्रविचार, हिंदू विचार संपत नाही हा खरा आत्मक्लेष आहे. याचे खरे दुःख आहे. EVM, निवडणूक प्रक्रिया, सत्तेचा दुरुपयोग हे दाखवण्याचे दात आहेत. महाराष्ट्रातील ह्या निवडणुकीत जाती-भेद विसरून हिंदू समाज एक झाला. एक होऊन मतदानास सिद्ध झाला. मतदानाची टक्केवारी वाढली. दलित, वनवासी, ओबीसी, बहुजन समाज सगळ्यांनी हिंदू म्हणून मतदान केले. निवडणुकीचा निकालाचा खरा अन्वयार्थ हा आहे. हा अन्वयार्थ लपवून ठेवण्यासाठी, डावी इको सिस्टीम लगेच तयार झाली. कारण त्यांना हा अन्वयार्थ सर्वत्र प्रसारित होणे एकूणच त्यांच्या विचाराच्या फायद्याचे नाही आणि विरोधी पक्षाच्या राजकीय भविष्याच्यादृष्टीने परवडणारे नाही. म्हणून सगळे एकत्र आले आणि EVM नावाचे एक निर्जीव गोष्टीवर सर्वांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

योगेंद्र यादव नामक डावा एजंट लेख लिहतो. खरगे भाषण ठोकतात. पवार नेहमीच्या शैलीत संशय पसरवतात. राऊत भोंगे वाजवतो आणि ठाकरे टोमणे मारतो. देशातील निवडणूक आयोग, न्यायालये यांच्यावरील लोकांचा विश्वास उडवून त्यांना आंदोलनजीवी बनवायचे आणि लोकमान्य सरकारे उद्ध्वस्त करायचे. ह्या बांगला देशातील यशस्वी समीकरणाची पुनरावृत्ती भारतात अधिक गतीने पुढे येणार आहे. तेथे मोहम्मद युनूस शोधला येथे असे अनेक बाबा आढाव उभे केले जाण्याची शक्यता आहे. आत्मक्लेष हे नाटक आहे, निमित्त आहे. जे जे भाजपा विरोधी, संघ विरोधी, हिंदुत्व विरोधी त्या सर्वांना एकत्र आणणे, ज्या हिंदू समाजाने भरभरून एकत्रितपणे मतदान केले त्यांच्यामध्ये फूट पाडणे, त्यांना निराश करणे, त्यांच्यात संभ्रम निर्माण करणे आणि पुन्हा हिंदूंना लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेपासून उदासीन करणे हा ह्या योजनेचा भाग आहे.

ह्यावेळी संत, महंत, धर्माचार्य बाहेर पडले त्यांनी जागृती निर्माण केली आणि त्यातून हिंदू समाजाला आपला आत्मा सापडला. त्याला आत्मबोध झाला. त्याला शत्रुबोध झाला. त्याची आत्मविस्मृती गेली त्याचा योग्य तो परिणाम निवडणूक निकालाने दाखवून दिला आणि खरे तर त्यामुळे ह्या लोकांना आत्मक्लेष झाला. तो उपोषण करून फक्त त्यांनी व्यक्त केला गेला एव्हढेच! उपोषण सुरू झाले की लगेच पवार, सुळे विविध लोकांचे राजकीय पर्यटन सुरू झाले. त्याच ठिकाणी संघ, मोदी, भाजपा यावर जहरी टीका सुरू झाली. नाही तरी ९०च्या दशकापासून महाराष्ट्रातील सगळे समाजवादी पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेतच. मग त्या मृणालताई असू द्या, भाई वैद्य असू द्या किंवा रत्नाकर महाजन असू द्या. पवार गँग आणि समाजवादी दोघांची ती गरज आहे. काही राजकीय दिवाळखोर झाले आहेत आणि काही वैचारिक. त्यात भर आता मातोश्री गँगची पडली आहे. त्यामुळे असे सगळे दिवाळखोर एकत्र येवून सर्वसामान्य जनमताचा एक प्रकारे अपमान करण्यास सिद्ध झाले आहेत. या प्रक्रियेत बाबा आढाव एक प्यादे आहे. काही वर्षांपूर्वी आण्णा हजारे यांना वापरून केजरीवाल नामक शहरी नक्षलवादी भारताच्या राजकीय क्षीतिजावर उदयाला आला.

आता असे प्यादे वापरून पुन्हा राजकीय पुनर्वसन करून घेण्याचे डाव कोणी आखत असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, समाज आता जागृत झाला आहे. तो उघड्या डोळ्यांनी बांगला देशात काय घडते आहे, भारतात संबलमध्ये काय झाले आहे ते बघतो आहे. उघड्या कानाने जिहादचे आणि हिंदूंना काफर म्हणून हिणवत असणारे नारे ऐकतो आहे. वक्फ बोर्ड नावाचा राक्षसी डायनासोर कानिफनाथ पासून सप्तशृंगीपर्यंत गीळंकृत करण्यास सिद्ध झाल्याने अस्वस्थ होतो आहे. त्याच्या हे लक्षात आले आहे ही अस्तित्वाची लढाई आहे.

श्री बाबा आढाव यांच्याशी वैचारिक मतभेद असूनही एक गाव एक पाणवठा, हमाल पंचायत, रिक्षा युनियन ह्यात त्यांनी विशिष्ट क्षेत्रात त्यांनी काम केले आहे त्याचे विश्लेषण येथे करायचे नाही. मोहम्मद युनूसलाही नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे पण आज मुस्लीम अतिरेकी संघटना पुढे तो नतमस्तक झाला आहे. इस्कॉन प्रमुखांच्या अटकेचे कारस्थान त्याच्या नाकाखाली शिजले आहे. माणसाच्या अंतिम प्रवासातील त्याचा मुक्काम महत्त्वाचा असतो. बाबा आढाव स्वतःची सुटका करून घेतली का? हा प्रश्न आहे. कारण कुणी कितीही नाकारलं तरी ‘एक है तो सेफ है’ आणि ‘बटोंगे तो कटोंगे’ ह्या वाक्यांचा नीट मतितार्थ समाजाला समजला आहे. आतापर्यंत हिंदूंना रोजच्या जीवन मरणाच्या संघर्षात गुंतवून आणि जाती-जातीमध्ये भांडणे लावून हिंदू म्हणून त्याची राजकीय अभिव्यक्ती होऊ न देण्याचा कुटील डाव हिंदूंनी ओळखला आहे. ह्याचा ज्यांना खरा आत्मक्लेष होतो आहे ते सगळे आढाव यांच्या उपोषणाचे निमित्त साधून राजकीय पर्यटन करत एकत्र येत आहेत आणि ‘Evm’ ला शिव्या देत आहेत. आपली आराध्य दैवतांची टिंगल टवाळी हिंदू समाजाला आता सहन होण्याच्या पलीकडची आहे. त्यामुळे मतदानातून तो शांतपणे व्यक्त होतो आहे. त्याला आपला मार्ग सापडला आहे. असे कितीही आत्मक्लेष करून घेतले तरी ढोंगी हिंदुत्ववादी आणि लाचार मुस्लीम लांगुनचालनवादी यांना हिंदू समाजाने पक्के लक्षात ठेवले आहे. पुढील काळ हा हिंदू नवचैतन्याची पहाट आणणारा आहे ती पाहण्यासाठी आत्मक्लेश नाही आत्मबोध होण्याची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -