श्रीनिवास बेलसरे
सुनंदाबाई घाणेकर आणि ना. दे. मोढवे यांनी ‘कार्तिकी चित्र’ या बॅनरखाली निर्माण केलेला ‘कैवारी’ हा कमलाकर तोरणेंचा सिनेमा १९८१ साली आला. कलाकार होते आशा काळे, शरद तळवलकर, विक्रम गोखले, मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, गणेश सोळंकी, पद्मा चव्हाण, लक्ष्मीछाया, अरुण सरनाईक, धुमाळ, दत्ता भट, आशा पाटील, राजा मयेकर आणि शिवाजी साटम. या कलाकारांची नुसती नावे पाहिली तरी कल्पना येते की, काही लोक एखाद्या छंदासाठी आयुष्यातली किती वर्षे देत असतात. खरे तर सारे आयुष्यच वेचतात. सर्वांनाच कीर्ती आणि संपन्नता मिळते असेही नाही पण कितीतरी वर्षे एका क्षेत्रात हे लोक निष्ठेने केवढी मेहनत घेत असतात. सुदैवाने वरील यादीतील बहुतेक कलावंत अतिशय यशस्वी आणि नामवंतच आहेत पण ते इतक्या पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ ४३ वर्षांपासून कार्यरत आहेत हे पाहून कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.
सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले होते शं. ना. नवरे यांनी. काहीशी राजकीय, काहीशी आदर्शवादी अशी ही कथा तशी अगदी साधी सरळ होती. महापौर भय्यासाहेब यांचा दारूचा चोरटा व्यवसाय आहे. (हल्लीसारखा त्याकाळी, म्हणजे ४३ वर्षांपूर्वी, हा व्यवसाय राजकरण्याचा एक प्रतिष्ठित व्यवसाय नव्हता!) देशमुखांचा भाचा शाम हा देसाई गुरुजींचा विद्यार्थी. त्याचे गुरुजींच्या घरी येणे-जाणे आहे. त्यातून त्याचे आणि गुरुजींची मुलगी विद्याचे, प्रेमप्रकरण सुरू होते. गुरुजींनी शामवर गावातील झोपडपट्टीत सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी दिलेली असते. जेव्हा शाम आणि विद्याच्या लग्नाची गोष्ट निघते तेव्हा पैशातच खेळणारे राजकारणी भय्यासाहेब देशमुख प्रचंड हुंडा मागतात. देसाई गुरुजी हल्लीसारखे ‘चांगली नोकरी मिळवून देणाऱ्या’ एखाद्या फॅक्टरीचे मालक नसल्याने गरीबच असतात. ते देशमुखांनी केलेल्या हुंड्याच्या मागणीमुळे अडचणीत येतात. दरम्यान देशमुखांचे अंगवस्त्र असलेल्या गुलाबशी त्यांचे भांडण होते आणि ती त्यांचे सगळे गैरव्यवहार उघडकीस आणते. शेवटी शाम आणि विद्याचे लग्न निर्विघ्नपणे पार पडते. अशी ही साधीसरळ कथा! सिनेमाला संगीत होते प्रभाकर जोग यांचे. गीतलेखन केले होते जगदीश खेबुडकर आणि अण्णासाहेब खाडिलकर यांनी. या सिनेमाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील जगदीश खेबुडकरांचे एक गीत चक्क इयत्ता ८वीच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आले होते. लावणीपासून भजनापर्यंत जबरदस्त लेखणी चालवणाऱ्या जगदीशबाबूंनी हे गाणे लिहिलेही तसेच होते.
शालेय मुलांनी आपल्या एका खरोखरच्या आदर्श शिक्षकाचा केलेला गौरव आणि त्यांना अतिशय प्रेमाने आणि आदराने दिलेले अभिवचन असा या गाण्याचा एकंदर आशय होता. खेबुडकरांनी तो खूप खुलवला आहे. हे गीत अनेक शाळांत खास गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायले जाई. खेबुडकरांच्या गीतातील ते सात्त्विक शब्द होते –
‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा’
चाळीसएक वर्षांपूर्वी शिक्षण आणि आरोग्यसेवा ही क्षेत्रे सेवेची आणि सेवाभावी लोकांची होती. हल्लीसारखी ती धंदेवाईक व्यापाऱ्यांची आणि कसाई मानसिकतेच्या कठोर लोकांनी ताब्यात घेतलेली नव्हती. डॉक्टरचे साऱ्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असत, तर शिक्षक, विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, कधी कधी शालेय विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची भूमिकाही पार पाडत. असे जगदीश खेबुडकरांनी म्हटले होते –
‘पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली,
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली,
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा!’
आम्ही चालवू हा पुढे वारसा…’
अनेक शिक्षक तर गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही करत. खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षकांनी पोटच्या मुलासारखे प्रेम आणि आत्मविश्वास दिला होता. पूर्वी गावातील कुणाचेही अभ्यासू पोर कित्येकदा शहरात गेलेल्या नातेवाइकांकडे तर कधी ओळखीचे किंवा परक्यांकडेही केवळ शिकण्यासाठी ठेवले जाई. त्याच्या जेवणा-खाण्यासह सर्व गोष्टींची काळजी ते कुटुंब घेई. हल्लीसारखे तेव्हा एका साभिनय, सस्मित “थँक यु”ने आणि एखादी किमती भेटवस्तू दिल्याने संपणारे ते नाते नसे. अशी नाती आयुष्यभर टिकून राहत. एखाद्या गरजवंत मुलाचा शून्यातून सुरू झालेला प्रवास फळाला आल्यावरही ते नाते अव्यक्तपणेसुद्धा शाबूत असे –
‘जिथे काल अंकुर बीजातले,
तिथे आज वेलीवरी ही फुले,
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!’
आम्ही चालवू हा पुढे वारसा…’
शिक्षक केवळ पाठ्यपुस्तकातले धडे शिकवून थांबत नसत. ते इतर विषयावरही बोलत. आपण वाचलेले, शिकलेले अनेक विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात त्यांना रस असायचा. त्यामुळे ते कधी रामायण, महाभारत, शिवरायांचे चरित्र, यातल्या गोष्टी सांगून मुलांमध्ये धैर्य, धाडस, विचारीपणा, नम्रता असे गुणही बिंबवण्याचा प्रयत्न करत. अलीकडे अनेक ठिकाणी दिसणाऱ्या पोटभरू चाकरमान्यांसारखे समाजवृक्षाला लटकलेले, पॅरासाईट्स नव्हते.
‘शिकू धीरता, शूरता, वीरता,
धरू थोर विद्येसवे नम्रता,
मनी ध्यास हा एक लागो असा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा…’
त्या काळी ‘आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधण्याची कला अवगत करणे म्हणजेच कारकीर्द बहराला येणे’ अशी व्याख्या नव्हती, तर प्रसंगी वाईटाचा सामना करणे, चुकणाऱ्याला शासन करणे, वाईटाचा मुकाबला करण्याची हिंमत दाखवणे, दुर्बलाला मदत करणे याही गोष्टींचे आदर्श शिकवले जात. आपल्या वर्तनातून असे वस्तुपाठ शिक्षक समाजाला आणि आपल्या विद्यार्थ्यांना घालून देत.
या गीताचे कवी स्वत: एक शिक्षकच होते. त्यामुळे त्यांनी हे गाणे खूप मनापासून लिहिल्याचे जाणवते. त्यामुळेच पुढच्या कडव्यात जणू खेबुडकर गुरुजींची मुले त्यांना आश्वासनच देत आहेत.
‘जरी दुष्ट कोणी करू शासन,
गुणी सज्जनांचे करू पालन,
मनी मानसी हाच आहे ठसा!’
सिनेमात हे गाणे देसाई गुरुजींच्या गौरवार्थ गायले गेले आहे. विद्यार्थी आपल्या गुरूला म्हणत आहेत, ‘तुम्ही केलेला त्याग, सेवा समाज लक्षात ठेवणार आहे त्यामुळे ‘गुरुजी, तुमची कीर्ती सतत गाजत राहील. तुमची पुण्यवान मूर्ती आम्ही कधीच विसरणार नाही.’ तुम्ही दिलेला ज्ञानाचा, सेवेचा, नम्रतेचा, शूरपणाचा वसा आम्ही कधीही सोडणार नाही. आम्ही स्वत: तो आचरणात आणून आमच्या पुढच्या पिढीकडेही सोपवू. ‘तुझी त्याग-सेवा फळा ये अशी,
तुझी कीर्ति राहील दाही दिशी.
अगा पुण्यवंता भल्या माणसा!’
आजचे चित्र बरेचसे निराशाजनक असले तरी अजूनही शिक्षणक्षेत्रात असे जाणकार शिल्लक आहेत जे अशी सुंदर बोधप्रद गाणी पाठ्यपुस्तकात घेऊन निदान पूर्वसुरींचा थोडातरी वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा मोठाच दिलासा म्हणावा लागेल.