Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMini Mahabaleshwar Dapoli : मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; पारा आठ अंशांवर

Mini Mahabaleshwar Dapoli : मिनी महाबळेश्वर दापोलीत हुडहुडी; पारा आठ अंशांवर

दापोली : दापोली (Dapoli) शहर परिसर अर्थात ‘मिनी महाबळेश्वर’ (Mini Mahabaleshwar) येथे कडाक्याची थंडी पडली आहे. आज पहाटे तापमानाची सर्वात कमी म्हणजेच ८.८ अंश सेल्सिअस नोंद झाली. यापूर्वी १९९९ मध्ये सर्वाधिक नीचांकी तापमानाची (३.४ अंश सेल्सिअस) नोंदही दापोलीत झाली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University) कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर शनिवारी (ता. ३०) ही नोंद झाली आहे. शुक्रवारी (ता.२९) सकाळी ८ पासून शनिवारी (ता.३०) सकाळी ८ वा. पर्यंत झालेल्या चोवीस तासांतील ही नोंद आहे.

मागिल वर्षी याच तारखेला कमाल तापमान ३१.४ अं.सें. तर किमान तापमान १६.८ अं.सें. होते, असे दापोली येथील कृषी विद्यापिठाच्या कृषी विद्या विभागातर्फे सांगितले.

सुरू झालेल्या थंडीमुळे उत्साही पर्यटकही थंडीचा आनंद लुटण्यासाठी दापोली हर्णै परिसरात हजेरी लावतील, अशी शक्यता आहे. दापोली शहर समुद्र सपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. त्यामुळे हे कोकणातील मिनी महाबळेश्वर अशी याची ओळख आहे. एवढ्या उंचीवर असले तरी अवघ्या ७ ते ८ किमीवर समुद्र किनारा आहे. सध्या किना-यावरदेखील गेले दोन दिवसांपासून थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे किनारपट्टीलादेखील थंड हवामान आहे. तर ग्रामीण भागातही सकाळी ९ वाजेपर्यंत चांगलेच धुके जाणवत असून दापोली-मंडणगड परिसर गारठला आहे.

Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये १६ जानेवारी २०२४ रोजी तापमानाची सर्वात कमी म्हणजेच ९.४ अंश सेल्सिअस नोंद झाली होती. तर १३ जानेवारी २०२३ रोजी नीचांकी ९.२ अंश इतके तापमान नोंदले गेले होते.

थंडीचा हंगाम सुरू होताच पक्ष्यांची गर्दी सुरू व्हायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत किना-यावर सकाळ, संध्याकाळ सिगल पक्ष्यांचा मुक्काम असतो. थंडीच्या कालावधीमध्ये या पक्ष्यांना पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल परिसर यामुळे हे पक्षी दरवर्षी काही कालावधीसाठी स्थलांतरित होतात.

यापूर्वीचे नीचांकी तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • ३ जानेवारी १९९९- ३.४
  • ९ फेब्रुवारी २०१९- ४.५
  • १५ फेब्रुवारी १९८५- ५.००
  • १९ फेब्रुवारी १९९६- ६.०
  • २३ जानेवारी १९९७- ७.०

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -