Sunday, February 9, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखविमाधारकाने जागरूक राहाणे महत्त्वाचे

विमाधारकाने जागरूक राहाणे महत्त्वाचे

स्नेहल नाडकर्णी

आम्ही दिवाळीत ट्रेनने कोकणात चाललो होतो. आमच्या सहप्रवाशांमधील एका तरुण प्रवाशाने इतर प्रवाशांबरोबर बोलायला सुरुवात केली. शेवटी त्याच्या संभाषणातून तो विमाविक्रेता आहे हे आमच्या लक्षात आले. त्याने त्याच्या कंपनीबद्दल व विविध विमा योजनांबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याच्या कंपनीद्वारे कमीत कमी हप्ता भरून विमाधारकाला जास्तीत जास्त फायदा कसा मिळू शकतो हे सांगण्याचा तो जीवापाड प्रयत्न करत होता. तुम्ही विमा उतरवून तुमच्या घरच्यांना छान दिवाळी भेट देऊ शकता असे त्याने सांगितले. सहप्रवाशांमधील दोन प्रवासी त्याच्या गावचे निघाले. त्या दोघांना त्याचे म्हणणे पटवून देण्यात तो यशस्वी ठरला. त्या १०-१२ तासांच्या प्रवासात दोन गिऱ्हाइकं त्याच्या गळाला लागली. सुट्टी घेऊन गावी जात असतानाही आपण दोघांना विमा घेण्यासाठी पटवले यामुळे झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. ते साहजिकच होते म्हणा, पण मला आश्चर्य वाटत होते ते त्या दोघा विमाधारकांचे.

विमा घेताना विमाधारकाने जागरूक व चिकित्सक राहाणे महत्त्वाचे ठरते. नाहीतर प्रत्यक्ष विम्याचे पैसे घ्यायची वेळ आली तर ते मिळणे दुरापास्त होऊ शकते. विमा उतरवणे महत्त्वाचे असले तरी आपण ज्या कंपनीकडून ज्या पद्धतीचा, गाडीचा, घराचा, व्यक्तीचा विमा घेणार आहोत त्याबद्दल सर्व नियम व अटी जाणून घेणे आणि विमा कंपनीला योग्य ती खरी माहिती पुरवणे ही आपली जबाबदारी आहे. विमा कंपनीनेही विमाधारकास याबद्दल सुचित करणे आवश्यक असते. त्याचबरोबर आपण गिऱ्हाईक न ठरता ग्राहक राजाचा बहुमान आपल्याला मिळावा यासाठी ग्राहकांनी जागरूक असणे व निर्माण झालेल्या तक्रारी विरोधात पाठपुरावा करून तक्रार निवारण करणे कसे महत्त्वाचे ठरते हे आपण नीता सिंग यांच्या उदाहरणावरून पाहू या. इंदोरस्थित दिलीपकुमार सिंग यांनी आपल्या आजारांबदल विमा कंपनीला सांगितले नसल्यामुळे अपघाती मृत्यू पश्चात विम्याचे पैसे मिळवणे त्यांच्या पत्नीला जिकिरीचे झाले. रु. ५० लाखांची एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी २८ जून २०१५ रोजी सिंग यांनी घेतली होती. १६ ऑगस्ट २०१५ रोजी ओंकारेश्वर ते उज्जैन दरम्यानच्या कावड यात्रेहून परतताना त्यांचा इंदोर-खांडवा रोडवर अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी नीता सिंग यांनी एचडीफसी स्टँडर्ड लाईफ इन्श्युसन्स कंपनीकडे विम्याचा परतावा मागण्यासाठी दावा केला. सिंग यांना आधी असलेल्या मधुमेह, हृदयविकार हे आजार व त्यांच्यावर करण्यात आलेली अँजिओप्लास्टि याबद्दल कंपनीला काहीच सांगितलेले नव्हते म्हणून कंपनीने त्यांचा दावा फेटाळला. म्हणून नीता सिंग यांनी न्यायालयीन कारवाई करण्याचे ठरवले.

त्यांनी मध्य प्रदेश राज्य आयोगाकडे दावा दाखल केला असता राज्य आयोगाने, विमा कंपनीचे म्हणणे योग्य मानून सिंग यांचा दावा निकालात काढला. नीता सिंग यानी हार न मानता राष्ट्रीय आयोगाकडे अपील केले. मि. सिंग यांनी विमा पॉलिसी घेण्याआधी आपल्या आजारांबद्दल कंपनीला सांगितले नाही ही त्रुटी असल्याचे राष्ट्रीय आयोगाने मान्य केले. कारण विमाकर्ता व विमाधारक दोघांमध्ये विश्वासार्हता असणे आवश्यक असते. पण पॉलिसी देण्याआधी १२ जून २०१५ रोजी एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्श्युरन्सने सिंग यांची वैद्यकीय तपासणी केली होती. याची जाणीवही विमा कंपनीला करून दिली. तसेच १७ ऑगस्ट २०१५ रोजी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार सिंग यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला असून त्यांनी पूर्वघोषित न केलेल्या आजारांचा त्यांच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. हे विचारात घेऊन एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्श्युरसने नीता सिंग यांना रु. ५० लाख विम्याची रक्कम, दावा केल्याच्या तारखेपासून प्रतिवर्ष ९% व्याजाने, रु २५००० दाव्याच्या खर्चासहित देण्याचे राष्ट्रीय आयोगाच्या खंडपीठाने नमूद केले.

आपल्यावर अचानक असा एखादा प्रसंग येतो तेव्हा आपण भांबावून जातो. कोर्टकचेरी करण्याच्या मनस्थितीत नसतो. तरी खंबीरपणे सामोरे गेलेल्या प्रत्येक प्रसंगावर आपण मात करू शकतो. कुठलीही सेवा किंवा वस्तू घेताना ग्राहकाची फसवणूक होऊ नये यासाठी दक्ष राहणे हे ग्राहकाचे आद्यकर्तव्य आहे आणि फसवणूक झाल्यास त्याविरोधात तक्रार करून न्याय मिळवणे हा ग्राहकाचा हक्क आहे. विलेपार्ले, जुहू, गिरगाव, सांताक्रूझ, दादर, ठाणे, चेंबूर, पुणे येथे मुंबई ग्राहक पंचायतीची तक्रार मार्गदर्शन केंद्रे आहेत. फसवणूक झाली असता कुठे आणि कशी दाद मागावी याबद्दल संभ्रम असेल तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या (०२२) ४७५०८५४१/४७५०८५४२ ह्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या email address वर संपर्क करून ग्राहकाला आपल्या नजीकच्या तक्रार मार्गदर्शन केंद्राचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, वेळ समजू शकेल. जागो ग्राहक जागो, अपने हक के लिये लडो. मुंबई ग्राहक पंचायत आपके साथ है, आप आगे तो बढो.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -